महाराष्ट्रात ८० हजार रेमडेसिवीरची गरज – संजय राऊत

मुंबई : २२ एप्रिल – महाराष्ट्रामध्ये ८० हजार रेमडेसिवीरची गरज असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना राऊत यांनी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात करोना चाचण्या होत असून सर्वाधिक करोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्राला अधिक आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी आमची मागणी असल्याचंही राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. गुजरातमध्ये मोफत रेमडेसिवीर वाटप सुरू आहे. राजकीय पक्षाला रेमडेसिवीर कसे मिळते हा गंभीर प्रश्न आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला उद्देशुन केलेल्या भाषणामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लसी कोणालाही कमी पडणार नाही असं म्हटल्याचा संदर्भ राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. पुढे बोलताना राऊत यांनी, पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं सांगितलेलं असतानाही महाराष्ट्रात लसी, रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनची कमतरता का निर्माण केली जातेय हा प्रश्न वारंवार निर्माण होत असल्याचं म्हटलं आहे.
“पंतप्रधान आणि केंद्र सरकारच्या मनात तसं काही नसेलही पण मग हे कोण राजकीय शुक्राचार्य आहेत जे फक्त महाराष्ट्राशी वैर घेऊन महाराष्ट्रातील लोकांच्या जीवाशी खेळताहेत ?”, असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. अशा संकट प्रसंगामध्ये राजकीय वैर घेऊन राजकारण करु नये, असंही राऊत यांनी प्रत्यक्षपणे कोणाचंही नाव न घेता म्हटलं आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री केंद्र सरकारशी संपर्क साधून योग्य तो निर्णय घेतील असा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केलाय.
महाराष्ट्रामध्ये लावण्यात आलेल्या निर्बंधांबद्दल बोलताना राऊत यांनी, “महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील अनेक मंत्र्यांचे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी आहे,” असं म्हटलं आहे. करोनाचा नवीन स्ट्रेन हा अधिक भयंकर असून इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक चाचण्या होत असल्याने रुग्ण संख्या अधिक असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात अधिक चाचण्या केल्या जात असल्याने रुग्ण संख्या अधिक आहे, असं राऊत म्हणालेत.

Leave a Reply