पॅट कमिन्सने एकाच ओव्हरमध्ये काढले ३० रन्स

मुंबई, 22 एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सचा बुधवारच्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध १८ धावांनी पराभव झाला. मात्र या पराभवातही कोलकाताच्या आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्स यांची फटकेबाजी सर्वांच्या लक्षात राहणार आहे. कमिन्सनं एकाच ओव्हरमध्ये ३० रन काढले असून , ३४ बॉलमध्ये ३ फोर आणि ६ सिक्सच्या मदतीनं ६६ रनची नाबाद खेळी केली.
एकाच ओव्हरमध्ये काढले 30 रन
कोलकाताची अवस्था 6 आऊट 112 अशी होती त्यावेळी रसेल आऊट झाल्यानंतर कमिन्स बॅटींगला आला. रसेल परतल्यानं कोलकाताची इनिंग संथ होईल असा चेन्नईच्या बॉलर्सचा अंदाज होता. पण कमिन्सच्या मनात काही तरी वेगळंच होतं. त्यानं सुरुवातीपासूनच चेन्नईच्या बॉलर्सची धुलाई सुरु केली.
सॅम करननं टाकलेल्या 16 व्या ओव्हरमध्ये कमिन्सनं 1 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीनं तब्बल 30 रन काढले. कोलकाताच्या टॉप ऑर्डरनं सपशेल निराशा केली होती. त्यानंतर कमिन्सनं 8 व्या क्रमांकावर बॅटींगला येत जोरदार फटकेबाजी करत विजयाच्या आशा जागवल्या होत्या.
कमिन्सनं एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारताच एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स मारण्याचा विक्रम त्यानं आता दोनदा केला आहे. यापूर्वी त्यानं मागच्या सिझनमध्ये जसप्रीत बुमराहच्या एका ओव्हरमध्ये 4 सिक्स मारले होते. आयपीएलमध्ये ही कामगिरी दोनदा करणारा तो तिसरा खेळाडू बनला आहे. ख्रिस गेलनं सर्वाधिक 7 वेळा ही कामगिरी केली आहे. तर हार्दिक पांड्यानंही कमिन्सप्रमाणे दोनदा ही एकाच ओव्हरमध्ये 4 सिक्स लगावले आहेत.

Leave a Reply