पत्नीनेच केली पतीची हत्या, मृतदेह फेकला रेल्वे रुळावर

बुलडाणा : २२ एप्रिल – बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील व्यक्तीच्या हत्येचे गूढ अखेर उकलले. नागझरी गावात पंक्चर दुरुस्तीचे काम करणाऱ्या रामधन दांदळे याची त्याच्या पत्नीनेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह तिने साथीदाराच्या मदतीने रेल्वे रुळांवर फेकला होता.
मिळालेल्या माहितीनुसार,नागपूर-मुंबई रेल्वे मार्गावरील नागझरी रेल्वे स्थानकाजवळ रुळांवर सोमवारी मृतदेह सापडला होता. मृत व्यक्तीचे हातपाय दोरीने बांधलेले होते. तर पाय हे धडापासून वेगळे झाले होते. या व्यक्तीची हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. हा मृतदेह नागझरी गावातील रामधन दांदळे याचा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तपास करून या हत्येचे गूढ उकलले. त्याच्या पत्नीनेच सहकाऱ्याच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेह रेल्वे रुळांवर फेकला. शेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या सहकाऱ्याला अटक केली.

आपला पती रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर रेल्वे रुळांवर त्याचा मृतदेह सापडल्याची तक्रार रामधन दांदळे याची पत्नी रेखा हिने पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला. बुलडाणा येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पथकातील ज्युली हिने आरोपींचा माग काढण्यात मोलाची कामगिरी केली. पोलिसांनी संशयावरून पत्नी रेखा आणि तिचा साथीदार संतोष साठे याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच, दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांना दोघांना अटक केली. या गुन्ह्यात आणखी किती जण सामील आहेत, याचा तपास सुरू आहे.

Leave a Reply