आपण आपला बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना सोपवू शकत नाही – ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : २२ एप्रिल – गुरुवारी पश्चिम बंगालमधल्या मतदारांनी सहाव्या टप्प्यासाठी मतदान केलं. गेल्या जवळपास दीड महिन्यापासून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. ती अजूनही २९ एप्रिलपर्यंत सुरूच राहणार आहे. पण तोपर्यंत बरेच आरोप-प्रत्यारोप आणि टीका-टिप्पणी बंगालच्या मतदारांपर्यंत पोहोचणार आहे. नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. “आपण आपला बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना सोपवू शकत नाही”, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत. कूचबेहेरमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर पश्चिम बंगालमधल्या प्रचाराचा चेहरा-मोहराच बदलून गेला असून दोन्ही बाजूंनी अधिक आक्रमक प्रचार सुरू केल्याचं चित्र सध्या पश्चिम बंगालमध्ये दिसत आहे.
पश्चिम बंगालच्या दक्षिण दिनाजपूरमध्ये सातव्या टप्प्यासाठीचा प्रचार सध्या सुरू आहे. एकीकडे राहुल गांधींनी करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील पुढच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या असतानाच भाजपाकडून देखील एकच प्रचारसभा किंवा व्हर्च्युअर प्रचारसभांचा पर्याय स्वीकारला जात आहे. पण ममता बॅनर्जी मात्र जोरदार प्रतार करत आहेत. दिनाजपूरमध्ये बोलताना त्यांनी भाजपावर खोचक टोमणा मारताना परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.
ममता बॅनर्जी यांनी भाजपाच्या शीर्ष नेतृत्व करणाऱ्या मंडळींवर तोंडसुख घेतलं आहे. “मी कुणी खेळाडू नाहीये. पण मला माहितीये खेळायचं कसं ते. मी सुरुवातीला लोकसभेतली सर्वोत्तम खेळाडू होते. आपण आपला बंगाल दिल्लीच्या दोन गुंडांना नाही सोपवू शकत”, असं ममतादीदी म्हणाल्या आहेत. त्यांच्या या विधानानंतर आता दोन्ही पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply