मुंबई : २१ एप्रिल – राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तिसरी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया छोटी असून सध्या पवारांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरून दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखू लागल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात ३० मार्चला दाखल केले होते. त्यावेळी छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर १२ एप्रिलला गॉल ब्लॅडरवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटल मधील डॉ. बलसरा यांनी ही शस्त्रक्रिया केली. यापूर्वीची शस्त्रक्रिया ही डॉ. अमित मायदेव यांनी केली होती. ही तिसरी शस्त्रक्रिया आहे.
“आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल (२० एप्रिल) संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज ट्विटवरुन दिली.