रेमडेसिवीर प्रकरणात राजेंद्र शिंगणे यांनी भाजपचा दावा फेटाळला

मुंबई : २१ एप्रिल – ब्रुक फार्मा कंपनीकडील रेमडेसिवीर खरेदी करण्याच्या प्रकरणावरून राज्यात मोठं राजकारण रंगलेलं दिसलं. मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांची चौकशी केल्यानंतर राज्याच्या अन्न व औषध खात्याच्या मंत्र्यांच्या सहमतीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा दावा भाजपाकडून करण्यात आला होता. भाजपाकडून करण्याता आलेला दावा राज्याचे अन्न व औषध मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी फेटाळून लावला आहे. कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात रुग्णसंख्या वाढल्यानंतर रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवू लागला होता. त्यामुळे सगळीकडे रेमडेसिवीरची शोधाशोध सुरू होती. त्यातच ब्रुक फार्मा कंपनीने रेमडेसिवीरचा साठा केल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यावरून ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून घेतलं होतं.
त्यावरून बराच गदारोळ झाला होता. तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या परवानगीनेच रेमडेसिवीरची खरेदी केली जाणार होती, असा आरोप भाजपाकडून करण्यात आला होता. त्या आरोपाला आता राजेंद्र शिंगणे यांनी उत्तर दिलं आहे. “कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर वाटण्याचा अधिकार नाही. भाजपाच्या काही लोकांनी त्यांच्या पुरवठादारांकडून रेमडेसिवीर खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. ते लोक मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल,” असं शिंगणे यांनी म्हटलं आहे.
रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राजकारण तापलं आहे. यातच आता राज्य सरकारने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांची बदली केली आहे. काळे यांची बदली केल्यावरूनही राजकारण सुरू झालं आहे. राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बदलीचं स्वागत केलं आहे. तर भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी या निर्णयावर टीका केली आहे.

Leave a Reply