मोदी सरकार देशातील समस्येबद्दल विरोधी पक्षांशी का चर्चा करू शकत नाही – प्रियांका गांधी

नवी दिल्ली : २१ एप्रिल – देशातील करोना संक्रमणाच्या वाढत्या फैलावावर काँग्रेसकडून मोदी सरकारवर जोरदार हल्ला केला जातोय. आरोग्य सुविधांपासून ते लसीकरण मोहिमेपर्यंत अनेक मुद्यांवर विरोधकांनी मोदी सरकारची लक्तरं काढली आहेत. याच दरम्यान काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनीही सरकारला निशाण्यावर घेतले आहे.
‘मोदी सरकार दुबईमध्ये आयएसआयशी चर्चा करू शकतं मग देशातील समस्येसंदर्भात विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करू शकत नाही? विरोधी पक्षांतील वेगवेगळ्या नेत्यांनी सरकारला सकारात्मक आणि रचनात्मक सूचना दिल्या आहेत. मी सकारात्मक पद्धतीनं आशा करतेय की, सरकारकडे जेवढ्या यंत्रणा आहेत त्या करोनाविरुद्ध लढण्यासाठी वापरल्या जाव्यात. केंद्र सरकारच्या मनात असेल तर अजूनही ऑक्सिजनची सुविधा निर्माण करता येऊ शकते’ असं प्रियांका गांधी यांनी म्हटलंय.
करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान सरकारची प्रतिक्रिया खूपच निराशादायक आहे. पंतप्रधानांसाठी हा प्रचार मोहिमेची वेळ नाही तर लोकांचे अश्रू पुसण्याचा आणि नागरिकांना धोकादायक विषाणूपासून वाचवण्याची ही वेळ आहे. एकीकडे लोक ऑक्सिजनसाठी रडताना दिसत आहेत तर दुसरीकडे पंतप्रधान निवडणूक रॅलीमध्ये हसताना दिसत आहेत’ असा घणाघाती हल्ला प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलाय.

‘आजही पंतप्रधान निवडणूक प्रचारात व्यग्र आहेत. ते मंचावर खिदळताना दिसत आहेत. लोक ऑक्सिजन, बेड, औषधांच्या कमतरतेमुळे रडत आहेत, मदत मागत आहेत… आणि तुम्ही रॅलीत जाऊन हसत आहात? तुम्ही असं कसं करू शकता?’ असा प्रश्नही प्रियांका गांधींनी पंतप्रधानांना विचारलाय.
मनमोहन सिंह यांनी १० वर्ष पंतप्रधानपदाची जबाबदारी हाताळली. त्यांचं व्यक्तीमत्व सगळ्यांनाच ठावूक आहे. देश महामारीचा सामना करत असताना त्यांनी स्वत: पुढे काही सूचना केल्या तर त्या सन्मानपूर्वक हाताळायला जायला हव्या होत्या, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारनं संवाद साधण्याची गरज व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे करोना संक्रमणाच्या संकटाशी लढण्यासाठी त्यांनी काही उपायही सुचवले होते. मात्र, या पत्राला आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन ‘तुम्ही दिलेल्या सूचना आठवडाभर अगोदरच अंमलात आणल्या गेलेल्या आहेत’ असं प्रत्यूत्तर दिलं होतं.

Leave a Reply