महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करा – माजी आमदार आशिष देशमुख

नागपूर : २१ एप्रिल – कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात आर्थिक व आरोग्य आणीबाणी लागू करावी, अशी मागणी काँग्रेस नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे.
आशिष देशमुख यांच्या या घरच्या आहेरामुळे आता विरोधकांकडून ठाकरे सरकारची अधिकच कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रात राज्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यात राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे पडत असल्याचे म्हटले आहे. राज्यात कोरोनामुळे ६० हजारपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संविधानाच्या कलम ३६० अन्वये महाराष्ट्रात दोन महिन्यांची आणीबाणी लावण्यात लागू करावी. अशीच परिस्थिती राहिली तर लोक रस्त्यावर उतरतील, अशी भीतीही आशिष देशमुख यांनी पत्रातून व्यक्त केली आहे. त्यामुळे आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले या सगळ्या वादावर कशाप्रकारे पडदा टाकणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

Leave a Reply