कोरोना रुग्णाने केला डॉक्टरवर चाकूहल्ला

मुंबई : २१ एप्रिल – मलबार हिल कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाने डॉक्टरवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णाच्या हल्ल्यात डॉक्टर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सध्या केले जात आहेत. डॉक्टरची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.
मलबार हिलमधील कोविड सेंटरमध्ये एका कोरोना रुग्णाने वादानंतर डॉक्टरवर हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. डॉक्टरने रुग्णाला मोठ्याने बोलण्यास मनाई केल्याच्या रागातून या रुग्णाने डॉक्टरवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. आयसीयूमध्ये हलविण्यावरून डॉक्टर व रुग्णात वाद झाला. त्यानंतर रुग्णाने डॉक्टरवर प्राणघातक हल्ला केला. या रुग्णाने डॉक्टरचा पाठलाग करत गळ्यावर आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसांत तक्रारही दाखल झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, जमखी डॉक्टरवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते आहे.

Leave a Reply