उत्तर प्रदेश सरकार १८ वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण मोफत करणार

लखनौ : २१ एप्रिल – १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण करण्यास केंद्राने परवानगी आहे. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारने १८ वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ करोना पॉझिटिव्ह आढळले असून सध्या विलगीकरणात आहेत.
उत्तर प्रदेशात वीकेण्ड लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत हा लॉकडाउन असेल. तसंच नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आलेला असून अत्यावश्यक सेवा वगळता इतर गोष्टींना परवानगी नाही.
योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत दिलेल्या माहितीनुसार, “मंत्रिमंडळ बैठकीत उत्तर प्रदेशातील १८ वर्षाच्या पुढील सर्वांना करोना लस मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचा पराभव होईल आणि भारत जिंकेल”.
योगी आदित्यनाथ यांनी लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्याचा तसंच वयोगटाप्रमाणे डेटा तयार करण्याचा आदेश दिला आहे. सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशात आरोग्य यंत्रणेसमोर हे मोठं आव्हान असणार आहे.
याशिवाय आसामनेही मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

Leave a Reply