यवतमाळ : २० एप्रिल – पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी शेत शिवारातील विहिरीत ११ एप्रिलला विवाहित तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. ती आत्महत्या नसून ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी २८ वर्षीय विवाहित मुलीची बाप, भाऊ आणि जावयाने हत्या केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी त्या तिघांना अटक केली आहे. रेखा राम शेडमाके (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील पेंढरी येथील रेखा हिचा विवाह कारेगाव (बंडल) येथील राम शेडमाके यांच्या सोबत झाला होता. काही दिवसांपूर्वी रेखा आपल्या माहेरी पेंढरी येथे आली होती. रविवार, ११ एप्रिलला पेंढरी येथील कवडू करपते यांच्या शेतातील विहिरीत रेखा शेडमाके हिचा मृतदेह नागरिकांना आढळून आला होता.
घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करिता रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर डॉक्टरांकडून आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्या महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. त्यानंतर तिला विहिरीत ढकलण्यात आल्याचे समोर आले.
घटनेचे गांभीर्य ओळखून अपर पोलिस अधीक्षक खंडेराव धरणे यांनी पांढरकवडा पोलिस ठाण्यात भेट देवून तपासाची गती वाढवून आरोपीस तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले. यानुसार पांढरकवडा पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून मृत महिलेचे नातेवाईक, गावकर्यांची चौकशी केली. गावातील चर्चेवर लक्ष केंद्रीत केले.
त्या महिलेजवळ मिळालेल्या चिठ्ठीतील संशयित मुकेश उर्फ देवेंद्र कनाके याची देखील चौकशी करण्यात आली. मात्र तपासात कुठलेच धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत नव्हते. महिलेचा खून हा सामाजिक प्रतिष्ठा राखण्याकरिता झाला असावा, असा संशय पांढरकवडा पोलिसांना आला.
मृत महिलेच्या कुटुंबियांना चौकशीकरिता पोलिसांनी ठाण्यात बोलावले. मात्र ते वारंवार पोलिसांची दिशाभूल करत होते. अखेर पांढरकवडा पोलिसांनी मृत महिलेचे वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे आणि जावई सुभाष मडावी यांना संशयित म्हणून ताब्यात घेत 16 एप्रिलला न्यायालयात हजर केले.
सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी 28 वर्षीय विवाहित मुलीला वडील विलास मरापे, भाऊ हिरामण आणि जावई सुभाष या तिघांनी 9 एप्रिलच्या रात्री 10 च्या सुमारास शेतात पकडून आणले. दोरीने मुलीचा गळा आवळून हत्या केली. तसेच तिच्या हस्ताक्षरात एक चिठ्ठी लिहून तिच्या हाताला बांधून तिला विहिरीत ढकलून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत 72 तासांतच संपूर्ण घटनेचा उलगडा केला.