राष्ट्रीय लोकशाही आघाडीत शिवसेना हा आमचा छोटा भाऊ होता आणि शिवसेनेशी युती करून आम्ही महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक एकत्रितपणे लढवल्या होत्या अशा आशयाचे विधान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिल्यानंतर महाराष्ट्रातील विशेषतः मुंबई आणि पुणे टापूतील राजकीय विश्लेषक पत्रकार आणि शिवसैनिकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्रात शिवसेना हा मोठा भाऊ होता आणि शिवसेनेच्या जोरावर भारतीय जनता पक्ष वाढला, आता भाजप बेईमान झाला आहे अशा आशयाची टीका समाजमाध्यमांवर होतांना दिसून येत आहे.
अशा प्रकारचे आरोप आणि टीका यापूर्वी अनेकदा झालेले आहेत. एखाद्या लहान मुलाने नाही मीच मोठा असा म्हणावे आणि घरातील मोठ्या व्यक्तींनी बार बाबा तूच मोठा असे मान्य करावे असाच हा प्रकार आहे. मात्र खरोखरी मोठा कोण? हे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.
शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली त्यावेळी शिवसेना ही फक्त मुंबई शहरात होती. नंतर हळूहळू शिवसेना वाढत गेली खरी पण तिचा विस्तार मुंबई, पुणे आणि नाशिक या टप्प्यातच होत राहिला मराठवाड्यात शिवसेना पोहोचायला बरीच वर्ष लागली पश्चिम महाराष्ट्रात तर आजही शिवसेनेचे फारसे वास्तव्य नाही विदर्भातही शिवसेना पोहोचली ती १९८७-८८ च्या दरम्यान नंतरही विदर्भात शिवसेनेचे अस्तित्व राहिले ते भाजपच्या मदतीने २०१४ मध्ये स्वबळावर विधानसभा लढवल्या तेव्हा विदर्भात शिवसेनेची चांगलीच दाणादाण उडाली होती.
शिवसेनेला मोठा भाऊ म्हणतांना शिवसेना समर्थक एक मुद्दा प्रकर्षाने मांडतात तो असा की शिवसेनेची स्थापना १९६६ साली झाली. तर भाजपची स्थापना १९८० साली झाली. मात्र, हे शिवसेना समर्थक एक बाब कायम सोयीस्कररीत्या विसरतात की भाजपची स्थापना जरी १९८०साली झाली असली तरी भाजप स्थापण्याआधी १९५२ पासून हा पक्ष भारतीय जनसंघ म्हणून अस्तित्वात होता. शिवसेनेचे आमदार विधिमंडळात १९७० नंतर आले मात्र जनसंघाचे आमदार १९५७ पासून महाराष्ट्राच्या विधिमंडळात होते. इतकेच काय पण महाराष्ट्रातून जनसंघाने खासदारही दिल्लीत पाठवले होते.
१९७७ मध्ये जनसंघ जनता पक्षात विलीन झाला मात्र तिथे न जमल्याने १९८० मध्ये जुन्या जनसंघाचा गट वेगळा होऊन त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला.
१९८० मध्ये भाजपच्या स्थापनेनंतर लगेचच विधानसभेच्या निवडणूका आल्या त्यावेळी भाजपचे माझ्या आठवणीनुसार १६ आमदार निवडून आले होते. यावेळी शिवसेनेचे १ किंवा २ आमदार विधानसभेत गेले होते. १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत देखील अशीच परिस्थिती होती. यावेळी शिवसेना मराठी माणसाचा मुद्दा घेऊन लढत होती. मात्र, नेमक्या याच काळात शिवसेनेने मराठीचा मुद्दा बाजूला ठेवत हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे धाव घेतली त्यामुळे भाजपनेही शिवसेनेशी युती करून निवडणूका लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळच्या चर्चेत आम्हीच मोठे भाऊ हा शिवसेनेने हट्ट धरला आणि भाजपने त्यावेळी हा हट्ट वाद नको म्हणून मान्य केला. परिणामी शिवसेनेने जास्त जागा लढवल्या त्यांचे जास्त आमदार निवडून आले आणि आधी विरोधी पक्षनेतेपद आणि मग १९९५ मध्ये मुख्यमंत्रीपद शिवसेनेने आपल्याकडे ओढून घेतले. यानंतर १९९९, २००४ आणि २००९ असे तीनदा आधीच्याच फार्म्युल्यानुसार शिवसेना आणि भाजप एकत्र लढले मात्र दरवेळी शिवसेनेचे संख्याबळ कमी होत गेले शेवटी २००४ मध्ये जास्त जागा लढवूनही शिवसेनेला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या आणि विरोधी पक्षनेतेपद नाईलाजाने भाजपकडे सोपवावे लागले.
२०१४ मध्ये जागा वाटपावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली दोघांनीही सर्वांच्या सर्व जागा लढवल्या यावेळी भाजपला १२२ जागा मिळाल्या तर शिवसेनेला ६१ जागांवर समाधान मानावे लागले २०१९ मध्ये भाजपसोबत लढूनही शिवसेना ५६ जागांवरच थांबली.
याशिवाय शिवसेना मुंबई, पुणे आणि नाशिक या टापूतच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला जोर ठेऊन आहे. इतरत्र शिवसेनेचे फारसे अस्तित्व दिसत नाही. या तुलनेत भाजपचे मात्र राज्यात सर्वत्र लक्षणीय अस्तित्व दिसते. ही परिस्थिती १९७०च्या काळातही होती आणि आजही तीच परिस्थिती आहे.
तरीही शिवसेनाच मोठा भाऊ असे म्हणणे हा बालहट्टच ठरणार नाही का?
अविनाश पाठक