वाशीम जिल्ह्यात इंटरनेटचे नेटवर्क मिळत नसल्याने लसीकरण मोहिमेत येतात अडथळे

वाशिम : २० एप्रिल – आपण खरंच एकविसाव्या शतकात आणि इंटरनेटच्या युगात राहत आहोत का? अशी शंका येईल असे प्रकार बऱ्याचदा ग्रामीण भागात घडलेले आढळून येतात. आपण 5G च्या स्वागतला सज्ज असताना अजूनही आपल्या ग्रामीण भागात नेटवर्कच्या शोधात लोकांना छतावर चढावं लागत आहे. मंगरुळपीरमध्ये असाच प्रकार पाहायला मिळाला. विशेष म्हणजे याठिकाणी लसीकरणाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना छतावर जाऊन नेटवर्क शोधावं लागतं. कारण खाली त्यांना नेटवर्कच मिळत नाही.
हा प्रकार आहे मंगरुळपीर तालुक्यातल्या चोरद, जनुना, पिंपरी खुर्द, पिंपरी अवगणमधील. याठिकाणी मोबाईल नेटवर्क व्यवस्थित नसल्यानं नागरिक, विद्यार्थी हैराण आहेतच. पण आता याठिकाणी लसीकरणातही यामुळं बाधा निर्माण झाली आहे. आरोग्यवर्धिनी केद्रातर्गंत इथं गावात घरोघरी जात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. पण या प्रक्रियेत नागरिकाची संपुर्ण माहिती अपलोड केल्यानंतरच लसीकरण करता येते. आता इथंच खरी अडचण सुरू होते.
गावात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटचाही दुष्काळच आहे. त्यामुळं आरोग्य कर्मचाऱ्यांना लोकांच्या छतांवर चढून नेटवर्क शोधावं लागतं. एकीकडे लसीकरणासाठी नागरिकांना तयार करण्यात कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. त्यानंतर नेटवर्कच्या या समस्येनं त्यांचा त्रागा होतो.
सरकार सर्वकाही ऑनलाईन करा म्हणत आहे. कोरोनाकाळत शिक्षणापासून आर्थिक व्यवहार सगळं मोबाईल आणि इंटरनेटवर चाललंय. पण अशा प्रकारच्या आदिवासीबहुल आणि दुर्गम भागातील गावांनी काय करायचं. याठिकाणी मोबाईल कंपन्या नेटवर्क कधी पुरवणार. अगदी महत्त्वाचा फोन करण्यासाठीही नागरिकांना उंच टेकडावर जावं लागतं. ऑनलाईन शिक्षणाचा तर या गावांमध्ये खेळ खंडोबाच झाला आहे.
या लसीकरण मोहीमेत डॉ. गजानन बोरकर, आरोग्य सेवक दादाराव तायडे, संदीप नप्ते तसेच सुवर्णा चव्हाण, वर्षा पाटील, मुख्याध्यापक नारायण बारड, दत्तात्रय लकडे, रविनंदन येवले, प्रविण उघडे, शंकर गोटे तलाठी एन पी पांडे सहभागी झाले होते. एकीकडं भारत जागतिक महासत्ता होण्याच्या गप्पा सुरू आहेत. दुसरीकडं ग्रामीण भागांकडे मात्र आजही कोणी लक्ष द्यायला तयार नाही असं चित्र आहे. व्यवसाय मिळतो अशा शहरी भागांमध्ये कंपन्या सुविधा देत आहेत. पण ग्रामीण भागांतही कंपन्यांनी सुविधा पुरवाव्यात यासाठी सरकारनंही आता पुढाकार घेणं गरजेचं ठरेल.

Leave a Reply