राज्यसरकारच्या संचारबंदी निर्बंधांमध्ये केली वाढ

मुंबई : २० एप्रिल – राज्य सरकारने महाराष्ट्रात १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाउन लागू केला आहे. यामध्ये संचारबंदीसोबतच इतरही अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्या निर्बंधांमध्ये आता अजून वाढ करण्यात आली असून लॉकडाउनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेषत: सकाळी ७ ते ११ या कालावधीमध्येच किराणा, भाजीपाला, फळे अशा सेवा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २० एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासूम हे नियम लागू केले जाणार आहेत. दरम्यान, यावरून विरोधकांनी सरकारवर टीका केली असून आता या ४ तासांमध्येच सगळी गर्दी होईल, अशी टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.
राज्य सरकारने नव्या निर्बंधांबाबत आदेश काढून त्यामध्ये खालील बाबींचा समावेश केला आहे.
१. सर्व किराणा दुकाने, भाज्यांची दुकाने, फळविक्रेते, डेअरी, बेकरी, सर्व प्रकरची अन्नपदार्थांची दुकाने, मांस-मच्छी-मटण विक्रेते, शेती उत्पादनांशी संबंधित दुकाने, प्राण्यांचे अन्नपदार्थ विकणारी दुकाने, पावसाळी साहित्य (छत्री, रेनकोट, ताडपत्री इ.) विकणारी दुकाने यांना सकाळी ७ ते ११ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे.
२. दरम्यान, वरील सर्व दुकानांमधून होम डिलीव्हरी मात्र सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये स्थानिक प्रशासनाला परिस्थितीनुरूप बदल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Leave a Reply