फाशीची शिक्षा झालेल्या कैद्याचा कोरोनामुळे झाला मृत्यू

नागपूर : २० एप्रिल – मुंबईत २००६ मध्ये झालेल्या रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचा नागपूरच्या कारागृहात मृत्यू झाला. कोरोना संसर्गानंतर कमाल अहमद मोहम्मद वकील अन्सारी याने प्राण सोडले. कमाल अहमद हा मूळ बिहारचा रहिवासी होता.
मुंबईत २००६ मध्ये लोकल रेल्वेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात कमालसह अन्य आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१५ मध्ये कमालची रवानगी नागपूर कारागृहात करण्यात आली होती. त्याला विशेष सेलमध्ये ठेवण्यात आले होते.
आठ एप्रिल रोजी कारागृह प्रशासनाने कैद्यांची कोरोना चाचणी केली असता कमालसह आठ जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. त्यानंतर कारागृह प्रशासनाने त्याला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी धंतोली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Leave a Reply