नागपूर : २० एप्रिल – राज्यात करोना लसीचा तुटवडा असताना व पात्र लोकांनाही लस मिळत नसताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय याच्या नियमबाह्य लसीकरणावरून सध्या वादाला तोंड फुटलं आहे. तन्मयच्या लसीकरणाशी फडणवीसांचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण भाजपनं दिल्यानंतर आता नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनं नवा गौप्यस्फोट केला आहे.
तन्मय फडणवीस यानं लस घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यानं नागपुरातील एनसीआय रुग्णालयात डोस घेतल्याचं फोटोत स्पष्ट दिसत आहे. तन्मयच्या लसीकरणावरून वाद उद्भवला आहे. सध्या केवळ ४५ वर्षे वयावरील व्यक्तींना, फ्रंटलाइन वर्करना व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जात आहे. तन्मयला यापैकी कोणत्या निकषावर लस दिली गेली, असा प्रश्न विचारला जात आहे. हा सगळा वाद सुरू असतानाच तन्मयला लसीचा डोस देणाऱ्या रुग्णालयाचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी वेगळीच माहिती दिली आहे.
‘तन्मयनं आमच्या रुग्णालयात कोविडचा दुसरा डोस घेतला होता. त्यानं पहिला डोस मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात घेतला होता. त्यानं पहिल्या डोसचं प्रमाणपत्र दाखवलं. त्या आधारे आम्ही त्याला दुसरा डोस दिला. मात्र, त्याला पहिला डोस कोणत्या निकषावर दिला गेला होता, हे आम्हाला माहिती नाही,’ असं जोगळेकर यांनी सांगितलं.