संजय गायकवाडांनी रात्रीची उतरण्यापूर्वीच पत्रपरिषद घेतली असावी – देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली

नागपूर : १९ एप्रिल: मला करोनाचे विषाणू सापडले तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबेन असं वक्तव्य करणारे शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोचऱ्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. गायकवाड यांना फडणवीसांनी विनंतीवजा सल्लाही दिला आहे.
गायकवाड यांच्या या टीकेबद्दल पत्रकारांनी विचारलं असता फडणवीस यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं. ‘रात्रीची उतरली नसतानाच गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेतली असेल. त्यामुळं ते असं बोलले असतील. त्यांना करोनाचे विषाणू माझ्या घशात घालायचेच असतील तर त्यांनी आधी ग्लोव्हज घालावेत, मास्क घालावा. कारण, करोनाचा धोका माझ्यापेक्षा त्यांना अधिक आहे. मला लोकांचे आशीर्वाद आहेत त्यामुळं मला फारसं काही होईल असं वाटत नाही. पण नॉर्मल माणसापेक्षा तळीरामांना करोना लवकर होतो असं मी ऐकलंय. त्यामुळं त्यांची तशी इच्छा झालीच तर त्यांनी मास्क वगैरे घालून काळजी घ्यावी,’ असा टोला फडणवीस यांनी हाणला.
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टीका केली होती. ‘गोयल यांना महाराष्ट्रात पाच लोक तरी ओळखतात का,’ असा सवाल मुश्रीफ यांनी केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, ‘मुश्रीफ यांनी गोयल यांच्यावर केलेली टीका निषेधार्ह आहे. मुश्रीफ हे कोणी ट्रम्प किंवा माधुरी दीक्षित आहेत का? त्यांनाही कोल्हापूरच्या बाहेर कोणी ओळखत नाही.’
रेमडेसिविर व ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून केंद्र व राज्य सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. करोनाच्या संकट काळात राज्य सरकारला मदत करण्याऐवजी केंद्र सरकार प्रत्येक ठिकाणी अडवणूक करत आहे, अशी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भावना आहे. त्याच अनुषंगानं बोलताना संजय गायकवाड यांनी रविवारी देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. ‘भाजपसारखं खालच्या पातळीचं राजकारण देशातच काय, जगातही कुणी करत नसेल. ह्यांना लाज वाटली पाहिजे,’ असं गायकवाड म्हणाले होते. तसंच, भाजपच्या लोकांबद्दल माझ्या मनात प्रचंड तिरस्कार असल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला होता. करोनाचे जंतू भेटले तर फडणवीसांच्या तोंडात नेऊन कोंबले असते, असंही ते म्हणाले होते.

Leave a Reply