शिवसेनेतील सगळेच संजय बेशिस्त – भाजप आमदाराची टीका

बुलडाणा : १९ एप्रिल – शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवरून भाजप आक्रमक झाला आहे. माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी गायकवाड यांच्या निमित्तानं शिवसेनेतील अन्य नेत्यांवरही हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेतील सगळेच संजय बेशिस्त आहेत,’ असं कुटे यांनी म्हटलं आहे.
राज्यातील करोनावरून भाजप राजकारण करत असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी रविवारी केला होता. त्यावरून त्यांनी मोदी व फडणवीस यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केली होती. करोनाचे विषाणू मला सापडले तर ते फडणवीसांच्या तोंडात कोंबेन, असं ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे. कुटे व विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांच्या विरोधात निदर्शनं केली होती. त्यानंतर कुटे यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही लक्ष्य केलं आहे.’काम कमी आणि बडबड जास्त. शिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त आहेत यात आता कसलीही शंका उरली नाही. आधी राऊत, नंतर राठोड आणि आता संजय गायकवाड,’ असं ट्वीट कुटे यांनी केलं आहे.खासदार संजय राऊत हे भाजपवर रोजच्या रोज हल्ले चढवत असतात. शिवसेनेचं मुखपत्र व ‘सामना’तून राऊत हे विरोधकांचा समाचार घेत असतात. त्यामुळं ते भाजपच्या रडारवर असतात. अलीकडंच पुण्यात एका तरुणीच्या झालेल्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी भाजपनं संजय राठोड यांनाही लक्ष्य केलं होतं. भाजपच्या विरोधानंतर राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. आता गायकवाड हे भाजपच्या निशाण्यावर आले आहेत.

Leave a Reply