नागपूर : १९ एप्रिल – नागपुरातील कोरोनास्थिती दिवसेंदिवस अत्यंत भयानक स्वरूपात समोर येत असल्याचे दिसत आहे. नागपुरातील कोरोनास्थितीबद्द्ल बोलायला आता शब्दही उरले नाहीत. रुग्णालयात तर रुग्णांना जागा मिळत नव्हतीच आता नागपुरातील रुग्णांचे होणारे मृत्यू पाहता नागपुरातील स्मशानातही आता जागा उरली नसल्याचे चित्र आहे. नागपुर शहरात होणारे कोरोना रुग्णांचे मृत्यू रोज नवीन विक्रम प्रस्थापित करताना दिसत आहेत. गेल्या २४ तासात ११३ रुग्णांचा झालेला मृत्यू हा समाजमन सुन्न करणारा आहे. त्यात ६३६४ नवीन बाधित रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पूर्व विदर्भातील परिस्थितीही काही वेगळी नाही पूर्व विदर्भात आज १००९० रुग्णांची नोंद झाली असून तब्बल १६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नागपुरातील रुग्णांना नागपुरात बेड्स उपलब्ध नसल्याने अमरावती जिल्ह्यात उपचाराकरिता पाठविण्यात येत असल्याची परिस्थिती असताना रुग्णांचे होणारे मृत्यू काही केल्या कमी होत नाही त्यात रोज विक्रमी वाढ होत आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ६३६४ रुग्ण आढळून आले असून नागपुरातील रुग्णसंख्या ३२९४७० वर पोहोचली आहे. आज आलेल्या रुग्णांमध्ये १७८० रुग्ण नागपूर ग्रामीण मधील असून ४५७८ रुग्ण शहरातील तर ६ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. शहरात एकाच दिवशी झालेल्या ११३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूमुळे शहराची मृत्युसंख्या ६३८६ वर पोहोचली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये ३२ ग्रामीण भागातील ७५ शहरातील तर ६ इतर जिल्ह्यातील रुग्णांचे आहेत.
शहरात आज १७९७८ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ४५८० ग्रामीण भागात तर १३३९८चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. नागपुरात सध्या ७०३९७ ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २८११२ ग्रामीण भागातील तर ४२२८५ शहरातील रुग्ण आहेत. आज ५०९७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २५२६८७ वर पोहोचली आहे तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७६.७० टक्क्यांवर पोहोचले आहे.