मुंबई : १९ एप्रिल – संपूर्ण देशातील परिस्थिती चिंताजनक आहे, प्रत्येक राज्यातून जे कोरोनाचे आकडे समोर येत आहेत, ते पाहता युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. एखाद्या युध्दानंतर बॉम्बिंगने माणसे उध्दवस्त होतात, तशा प्रकारे सर्व काही उध्दवस्त होताना दिसत आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदच किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
आता इतर राज्यातील कोरोना रुग्णांच्या आकड्यांची लपवाछपवी बंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. अनेक राज्यात जागोजागी चिता भडकेल्या दिसत आहे. रस्त्यावरती रुग्ण दिसत आहेत. आपण ही परिस्थिती लपवत राहिलो तर देशात अराजकता माजेल, असेही राऊत म्हणाले.
प्रत्येक राज्यात काय चालू आहे? देशाची परिस्थिती काय आहे? राज्यांना काय आवश्यक आहे? देशाची आर्थिक? आरोग्यविषयक स्थिती काय आहे? याविषयी दिल्लीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून, कोविड परिस्थिती संदर्भात विशेष अधिवेशन ताबडतोब बोलाविणे गरजेचं आहे. देशाच्या संकटावर चर्चा होणं या परिस्थितीत आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.
विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांशी रेमडेसिवीरबाबत चर्चा केली पाहिजे. राज्यासाठी ते मिळवण्यासाठी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली असती, तर त्याचे श्रेय विरोधी पक्षालासुद्धा घेता आले असते. परंतु, यासंदर्भात काहीतरी मोठे रॅकेट सुरू होत, लपवाछपवी सुरू होती, राजकारण सुरू होत हे त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होत आहे. जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात चौकशीचे संकेत दिले आहेत, असे राऊत यांनी सांगितले.
अमित शाह देशाचे गृहमंत्री आहे, पश्चिम बंगाल प्रचार करून ते दिल्लीत आले आहेत. पण ते आता लॉकडाऊनचा नको असे म्हणत असतील तर त्यांचाकडे काय उपाययोजना आहेत? त्या जाहीर कराव्यात, असेही राऊत म्हणाले.