परिस्थिती नियंत्रणाबाहेर, ८५ रुग्णांचा मृत्यू तर ७१०७ बाधित

पूर्व विदर्भात १५१ मृत्यू तर १२३३६ नवीन बाधित

नागपूर : १८ एप्रिल – नागपूरसह पूर्व विदर्भात सुरु असलेल्या कोरोना मृत्यूचे तांडव अधिक भयावह स्वरूपात जनतेसमोर येत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मृत्यूंमुळे आता स्मशानातही जागा मिळते की नाही? असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पूर्व विदर्भ कोरोनाच्या आगीत अक्षरशः होरपळून निघत आहे. नागपूर पाठोपाठ भंडारा आणि चंद्रपूर शहरातही परिस्थिती हाताबाहेर गेल्याची स्थिती आहे. आज पूर्व विदर्भात तब्बल १५१ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२३३६ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर नागपूर शहरात गेल्या २४ तासात ८५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून तब्बल ७१०७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर पाठोपाठ चंद्रपूर शहरात १५८४ बाधित तर २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे आणि भंडाऱ्यात १२४४ बाधित रुग्ण आढळले असून २६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी सतत काम करीत असतानाही कोरोना रुग्णांचे वाढते मृत्यू रोखण्यात त्यांनाही यश येत नाही याचे कारण जनता करत असलेले दुर्लक्ष. वेळेवर उपचार ना घेता रुग्ण घरीच उपचार करण्यावर भर देतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल होतात त्यामुळे रुग्णांच्या मृत्यूत वाढ होत असल्याचे जाणकारांचे मत आहे. नागपूर शहरातील कोरोनास्थिती आता नियंत्रणाबाहेर गेल्याची स्थिती आहे. प्रशासन करत असलेले प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे नागपुरात होणारे रोजचे मृत्यू आणि वाढती रुग्णसंख्या.
नागपूर शहरात गेल्या २४ तासात ८५ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे त्यात ३३ रुग्ण ग्रामीण भागातील असून ४५ रुग्ण हे शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण मृत्युसंख्या ६२७३ वर पोहोचली आहे. तर आज शहरात ७१०७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले असून त्यात २४९८ ग्रामीण भागातील तर ४६०२ शहरातील तर ७ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत.
नागपूर जिल्ह्यात आज एकूण २६७९२ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात १२८५३ ग्रामीण भागातील तर १३९३९ चाचण्या शहरातील रुग्णांच्या घेण्यात आल्या. आज ३९८७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून एकूण कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता २४७५९० वर पोहोचली आहे तर कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण ७६.६३ टक्क्यांवर आले आहे. शहरात सध्या ६९२४३ ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यात २७४६४ ग्रामीण भागातील तर ४१७७९ शहरातील आहेत.

Leave a Reply