नागपुरात मनाई हुकूम मोडून रस्त्यावर फिरणाऱ्यांमध्ये सापडले १८ जण कोरोना पॉझिटिव्ह


नागपूर : १८ एप्रिल – रस्त्यांवरील बेजबाबदार नागरिकांची गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या आदेशाने शहरात ६० ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे. यापैकी पाच ठिकाणी वाहनचालकांची रॅपिड अँटीजेन कोविड चाचणी घेण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये २५५ वाहनचालकांची टेस्ट करण्यात आली असून त्यापैकी १८ वाहनचालकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवारपासून ही मोहीम आणखी व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे. त्यामुळे नियम व कायदे तोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांचे पालन नागरिक करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांवर गर्दी वाढल्याचे चित्र आहे. रस्त्यावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने नागपूर पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. बेजबाबदारपणे फिरताना आढळणाऱ्या लोकांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या मदतीने पोलिसांनी शहरात पाच ठिकाणी असलेल्या नाकेबंदी पॉईंटवर कोविड चाचणी सुरू केली आहे. या चाचणीचा अहवाल लगेच प्राप्त होत असल्याने पॉझिटिव्ह आलेल्या नागरिकांची रवानगी थेट विलगीकरण केंद्रात केली जात आहे. शनिवारी २५५ वाहन चालकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १८ वाहनचालकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्या सर्वांना विलगीकरण केंद्रात पाठवण्यात आले आहे.

Leave a Reply