देशात तातडीने लॉकडाऊन लावण्यात येणार नाही – अमित शाह


नवी दिल्ली : १८ एप्रिल – महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशभरात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: कहर निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. प्रथमच भारतात एका दिवसात 2.61 लाखांहून अधिक कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक राज्य सरकारांनी कठोर निर्बंध लागू केले आहेत. मात्र, असे असले तरी कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला आहे. त्यामुळे देशभरात कोरोना विषाणूचा वेगाने संसर्ग होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यात येण्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एका मुलाखतीत गृहमंत्री अमित शहा यांना विचारण्यात आले की, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन हा एक पर्याय आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अमित शहा म्हणाले, आम्ही अनेकांसोबत चर्चा करत आहोत. गेल्यावर्षी कोरोनाचा संसर्ग होता तेव्हा देशात लॉकडाऊन लावण्याचा उद्देश वेगळा होता. मूलभूत सुविधा, वैद्यकीय आणि उपचारासाठी तयारी करायची होती. अमित शहा यांनी स्पष्ट केले की, देशात तातडीने लॉकडाऊन लावण्यात येणार नाही आणि या क्षणाला तशी परिस्थितीही दिसत नाहीये.
अमित शहा यांनी पुढे म्हटलं की, गेल्यावर्षी आम्ही कोरोनाचा सामना करण्यासाठी तयार नव्हतो. आपल्याकडे औषध किंवा लस उपलब्ध नव्हती. आता परिस्थिती खूप बदलली आहे. डॉक्टरांनाही कोरोना संदर्भात खूप माहिती मिळाली आहे, लस उपलब्ध झाली आहे. तरी सुद्धा आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करत आहोत. सर्वांचं एकमत असेल त्या अनुषंगाने पुढे जाऊ. सध्यस्थितीत जी परिस्थिती दिसत आहे ती पाहता लॉकडाऊन सारखी स्थिती दिसत नाहीये.
कोरोनाची दुसरी लाट आणि पाच राज्यांच्या निवडणुका या संदर्भात अमित शहा यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रात निवडणुका नाही तरी कोरोनाचा संसर्ग का? तरी 60,000 बाधितांची दररोज नोंद होत आहे आणि निवडणुका आहेत तिकडे हा आकडा 4000 आहे. त्यामुळे कोरोनाची लाट आणि निवडणुका यांना एकत्र केलं नाही पाहिजे. ज्या राज्यांत निवडणुका नाही झाल्या तेथेही कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली. यावर तुम्ही काय म्हणाल? आम्हाला महाराष्ट्राची सुद्धा काळजी आहे आणि पश्चिम बंगालची सुद्धा.

Leave a Reply