खर्ऱ्याचे सेवन करणाऱ्या सहा मित्रांना कोरोनाची झाली लागण


चंद्रपूर : १८ एप्रिल – राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा वसाहती जवळील एका चबुतर्यावर सायंकाळी गप्पागोष्टी करीत खर्र्याचे सेवन करणार्या सहा मित्रांना कोरोनाची लागण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे कोरोना काळात काळजी न घेणार्या या मित्रांना खर्रा खाणे अंगलट आले आहे.
वेकोलिच्या सास्ती-धोपटाळा या कोळसा खाण कामगारांच्या वसाहतीजवळ आयटक व बीएमएम या कामगार संघटनांचे कार्यालय आहे. या समोरच रस्त्याचे बाजूला एक सिमेंटचा चबुतरा आहे. खाणीतील काम संपल्यावर सायंकाळी या चबुतर्यावर येऊन गप्पागोष्टी करीत काही लोक बसतात. हा या वसाहतीत राहणार्या सहा कामगार मित्रांचा छंद आहे. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यातही यात खंड पडत नाही. अर्थात, या चर्चेचे वेळी काहींना खर्रा व तंबाखू खाण्याचा छंद होता. या गोष्टी एकमेकांना आग्रह करून भरविण्यात त्यांना मित्रत्वाचा खरा अनुभव येत असावा.
पण नुकताच यापैकी एकाला ताप आला आणि त्याने कोरोना तपासणी केली असता, त्याचा अहवाल बाधित आला. त्यानंतर या सर्वच मित्रांनी कोरोना तपासणी करण्याचे याच चबुतर्यावर ठरविले. तपासणी नंतर सर्वच सहाही मित्र बाधित निघाले. यापैकी एकाला चंदपुरला खाट न मिळाल्याने त्याला अमरावतीला हलविण्यात आले. त्यानंतर परिवाराची कोरोना तपासणी करण्यात आली. यात काहींच्या पत्नी बाधित निघाल्या. कोरोना विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली असताना केवळ दुर्लक्ष व निष्काळजीमुळे या लोकांसह त्यांच्या परिवाराला आता रूग्णालयात भरती होण्याची पाळी आली आहे. आता मात्र, कुणीही या चबुतर्यावर बसायला धजावत नाही.

Leave a Reply