नवी दिल्ली : १८ एप्रिल – सध्या देशभरात कोरोनाची स्थिती बिकट होत चालली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे आणि दुसरीकडे रुग्णांना बेड आणि ऑक्सिजन अपुरा पडत आहे. ही परिस्थिती फक्त सर्वसामान्यांचीच नाही तर मंत्र्यांच्या नातेवाईकांचीही आहे. नुकतचं केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री जनरल व्ही.के.सिंह यांनी त्यांच्या भावाला रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्याचं ट्वीट केलं आहे. सध्या त्यांचं हे ट्वीट व्हायरल होत आहे. व्हि.के. सिंह हे मोदी सरकारमधील मंत्री तर आहेतच शिवाय ते भारताचे माजी लष्करप्रमुखही आहेत. त्यांच्या या ट्वीटमध्ये देशातील भीषण परिस्थिती समोर येत आहे.
जर केंद्रीय मंत्र्याची ही परिस्थिती असेल तर सर्वसामान्य नागरिकांचं काय? असा सवाल उपलब्ध होत आहे. व्हि.के.सिंह यांनी ट्वीट केलं आहे की, आमची मदत करा. माझ्या भावाला कोरोनाची लागण झाली असून त्याच्यावर उपचार करण्यासाठी रुग्णालयात बेडची गरज आहे. यावेळी त्यांनी गाझियाबादच्या जिल्ह्याधिकाऱ्यांनाही टॅग केलं आहे. गाझियाबादमध्ये बेडची व्यवस्था होत नसल्याचंही त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काही वेळानंतर हे ट्वीट डिलिट करण्यात आलं असून यावर मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. भावाला बेड उपलब्ध झाल्याचे त्यांनी या ट्वीटमध्ये म्हटले आहे.