दीप सिद्धूला दिल्ली न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली : १७ एप्रिल – दिल्लीत लाल किल्ल्यावर २६ जानेवारी रोजी धार्मिक झेंडा फडकवल्याप्रकरणी दीप सिद्धूला पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी दिल्ली न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला आहे. दीप सिद्धूला तीस-तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे. त्याचबरोबर न्यायालयाने जामीन देताना काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्याला त्याचा पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे जमा करण्यास सांगितला आहे. त्याचबरोबर तो वापरणार असलेल्या फोन नंबरची नोंद तपास अधिकाऱ्याकडे करण्यास सांगितली आहे. या फोनचं लोकेशन २४ तास ऑन ठेवण्याबरोबर फोन स्विच ऑफ करण्यास मनाई केली आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि १५ तारखेला आपलं लोकेशन सांगण्याची अट ठेवली आहे.
८ एप्रिलला झालेल्या सुनावणीत आरोपी दीप सिदधूने स्वत: निर्दोष असल्याचा युक्तिवाद न्यायालयासमोर केला होता. तसेच जामीन देण्याची विनंती केली होती. या प्रकरणात मला फसवलं जात असल्याचा आरोप केला होता. तर सरकारी पक्षाने जामीन अर्जाला विरोध करत दीप सिद्धू मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान २६ जानेवारी रोजी दिल्लीत हिंसाचार झाला होता. प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर परेडदरम्यान आंदोलकांनी लाल किल्ल्यावर चढून धार्मिक झेंडा फडकावला होता. त्यानंतर दीप सिद्धूला अटक केली होती. २३ फेब्रुवारीला त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.

Leave a Reply