पुणे: १७ एप्रिल – राज्यात करोनाने थैमान घातलेलं आहे. मुंबई, पुणे या सारख्या मोठ्या शहारांमध्ये तर करोनाबाधितांच्या संख्येत दररोज झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी येथील आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची चिन्ह आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या तुलनेत रूग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होत नसल्याने, रूग्णांचे हाल सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील ससून रूग्णालयातील असाच एक धक्कादायक व आजचं वास्तव दाखवणारा प्रकार समोर आला आहे. या रूग्णालायत एकाच बेडवर दोन जणं, तर काही रूग्ण फरशीवर झोपून उपाचर घेत असल्याचं समोर आलं आहे.
राज्य सरकारने राज्यात १४ दिवसांसाठी लॉकडाउनची घोषणा केलेली आहे. मात्र तरी देखील अनेकजण विनाकारण अद्यापही घराबाहेर पडताना दिसत आहेत. परिणामी रूग्णसंख्येतील वाढ सुरूच आहे. नागरिकांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखून घरात राहून प्रशासनाला सहकार्य करणं अपेक्षित आहे.
पुणे शहर आणि जिल्ह्यात मिळून दररोज सरासरी ८ हजारांच्या पुढे करोनाबाधित आढळून येत आहेत. त्यामुळे पुणे शहरातील जम्बो, ससून आणि खासगी रुग्णालयं भरली आहेत. सध्याच्या परिस्थितीत कालरात्री पर्यंत ३ लाख ४९ हजार ४२४ इतकी करोनाबाधितांची संख्या झाली असून, ५ हजार ९५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, २ लाख ८९ हजार १२२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, ही सर्व आकडेवारी कालपर्यंतची आहे.
दरम्यान आज ससून रुग्णालयामधील एक व्हिडिओ समोर आला असून, त्यामध्ये एका बेडवर दोघांवर उपचार दिले जात असल्याचे दिसत आहे. काही जणांना फरशीवर तर काही रुग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजन दिला जात आहे.