अतुल लोंढेंनी लांडी मुजोरी आतातरी थांबवावी

संपादकीय संवाद


Avinash Pathakकाँग्रेसचे नागपूर शहरातील राज्यस्तरीय प्रवक्ते अतुल लोंढे यांनी गेल्या २ दिवसात केलेला प्रकार याला राजकीय आचरटपणा याशिवाय दुसरे कोणतेही नाव देता येणार नाही. राजकारणात विरोधकांवर टीका ही करायचीच असते त्यासाठी राजकीय प्रवक्त्यांना कायम छिंद्रान्वेषी धोरण अवलंबणे आवश्यक असते मात्र, छिद्र शोधण्याच्या नादात छिद्र नसतानाही इथे भोक पडले आहे असा भास होऊ लागतो तेव्हा अशा प्रवक्त्याची काळजी करणे आवश्यक ठरते.
झाले असे की २ दिवसांपूर्वी अतुल लोंढे यांनी एक पत्रक काढले नागपुरात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर गेली असताना नागपूरचे लोकप्रतिनिधी असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काय करत आहेत? असा सवाल त्यांनी केला होता. त्याचबरोबर महानगर पालिका गेली १५ वर्ष भाजपच्या ताब्यात असूनही रुग्णव्यवस्थेत इतका गोंधळ का? हे देखील त्यांनी विचारले होते.
हे पत्रक जेव्हा काढले त्यावेळी गडकरी आणि फडणवीस काय करत आहेत याचा शोध घेण्याचा पंचानामाने प्रयत्न केला त्यावेळी गडकरी आणि फडणवीस हे नागपूरच्या नॅशनल कँसर इंस्टिट्यूट आणि एम्स या संस्थांमध्ये जाऊन कोरोना रुग्णांसाठी अतिरिक्त बेड्स कसे तयार करता येतील याचे नियोजन करत असल्याची माहिती मिळाली. लोंढेंनी पत्रक काढण्याच्या चार दिवस आधी नागपुरात रेमेडिसिवीर या इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता यावेळी अतुल लोंढेचे विद्यमान नेते नाना पटोले हे रेमेडिसिवीर आणि कोवॅक्सिन तुटवड्यासाठी केंद्र सरकारला जबाबदार धरत होते. त्यांच्या सोबत लोंढेचा काँग्रेस पक्ष सहभागी असलेल्या महाआघाडीचे सर्व नेतेसुद्धा केंद्रावरच तुटून पडत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी राजकारणाची झूल बाजूला काढून ठेवत सरळ रेमेडिसिवीर बनवणाऱ्या कंपन्यांच्या मालकांशी फोनवर संपर्क साधला नागपूर शहरात तातडीने रेमेडिसिवीरचे १० हजार इंजेक्शन्स बोलावून घेण्याची सोय केली नागपुरात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता तसेच व्हेंटीलेटर्सचीही कमी जाणवत होती गडकरींनी या दोन्हींची सोय करण्यासाठी यशस्वी पुढाकार घेतला. देवेंद्र फडणवीस यांनीदेखील नागपुरातील यंत्रणेला हाताशी धरून रुग्णांसाठी अतिरिक्त बेड्स कसे उपलब्ध होतील याची व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतला. गडकरी आणि फडणवीसांच्या या सर्वच सकारात्मक बाबींची नोंद नागपुरातील माध्यमांनी घेऊन जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हातभार लावला होता मात्र, घडत असलेल्या गोष्टींकडे डोळेझाक करत त्या घडल्याचं नाहीत अशी ओरड करण्यात लोंढेचा हातखंडा आहे. असलेल्या छिंद्रांकडे दुर्लक्ष करायचे आणि नसलेली भोके आहेतच असे भासवून जनसामान्यांना भ्रमित करण्याचा लोंढेचा नेहमीचाच उद्योग आहे.
लोंढेचा विद्यमान पक्ष (कारण लोंढे अधून मधून पक्ष बदल करत असतात) काँग्रेस हा राज्यात सत्तेत आहे सार्वजनिक आरोग्य हा देशाच्या घटनेनुसार राज्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. त्यामुळे कोरोनाच्या साथीत राज्यातील जनसामान्यांचे आरोग्य नीट कसे राहील याची जबाबदारी राज्य सरकारची आहे मात्र, सत्ताधारी महाआघाडीचे नेते स्वतः काहीही न करता केंद्र सरकारवर दुगाण्या झाडण्यातच धन्यता मानतात. मान्य आहे की गडकरी आणि फडणवीस हे नागपुरातील लोकप्रतिनिधी आहेत पण ते दोघेही विरोधी पक्षात आहेत सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकारचे दोन विद्यमान मंत्री नागपुरात आहेत. दोघेही लोंढेंच्याच पक्षाचे आहेत. त्यातील एक नागपूरचे पालकमंत्रीही आहेत. त्यांना लोंढे जाब का विचारत नाहीत?
महापालिका गेली १५ वर्ष भाजपच्या ताब्यात आहे याकडे लोंढेंनी बोट दाखवले आहे मात्र महापालिकेत भाजपचे राज्य असले तरी राज्यात भाजपविरोधकांची सत्ता आहे. राज्यातील भाजप विरोधक राज्यकर्ते आपल्या ताब्यात असलेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना कसे अडचणीत आणतात हे नागपूरकरांना माहित आहे. महापालिकेतील प्रशासनाला अनेकदा पालकमंत्रीच नाचवतात आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात सुद्धा घेत नाही आणि बैठकींनाही बोलावत नाही हे उभ्या नागपुरला ज्ञात आहे. त्यामुळे महापालिकेला दोषी धरणे ही देखील लोंढेची फुकाचीच कसरत आहे. हे स्पष्ट दिसते आहे.
लोंढेंनी नसलेली छिद्रे दाखवण्याचा हा पोरकट प्रयत्न करण्यासाठी पत्रक काढले त्याला भाजपचे प्रदेश माध्यम प्रमुख विश्वास पाठक यांनी उत्तर दिले त्याचवेळी नागपूर महापालिकेतही भाजप पक्षनेत्यांनी पत्रपरिषद घेऊन वास्तव जनतेसमोर मांडले यानंतर तरी लोंढेंनी शांत राहायला हवे होते. मात्र त्यांनी आपली मुक्ताफळे उधळणे चालूच ठेवले. अशा प्रकाराला नागपुरी भाषेत लांडी मुजोरी असे म्हणतात तशी लांडी मुजोरी लोंढेंनी सुरूच ठेवली आहे. यावेळी मात्र गडकरी आणि फडणवीस शहरातील रुग्णालयांमध्ये फिरून रुग्णांची व्यवस्था कशी लावता येईल या प्रयत्नात व्यस्त होते.
मांजर डोळे मिटून दूध पिट असले तरी बघणार्यांचे डोळे उघडे असतात या न्यायाने अतुल लोंढे आणि सर्वच काँग्रेसजनांनी कितीही ओरड केली तरी जनतेचे दिले उघडे आहेत. याचे भान ठेऊनच लोंढेंनी ही लांडी मुजोरी करावी इतकाच आमचा त्यांना मित्रत्वाचा सल्ला आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply