२५ वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळल्याने उडाली खळबळ


बुलढाणा: १६ एप्रिल – २५ वर्षीय घटस्फोटित तरुणीचा मृतदेह आढळल्याने बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर परिसरात खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यावर आणि हात आणि पायांवर चाकूने वार केल्याच्या खुणा होत्या. आज सकाळी ही घटना उघडकीस आली. माधुरी भीमराव मोरे असे मृत तरुणीचे नाव असून, ती बुलडाणा एसटी डेपोत वाहक म्हणून काम करत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, माधुरी भीमराव मोरे ही अंत्री खेडेकर चिखली येथे राहात होती. बुलडाणा आगारात वाहक या पदावर कार्यरत होती. दोन दिवसांपूर्वी तिचे आपल्या वडिलांसोबत बोलणे झाले होते. त्यावेळी साखळी या ठिकाणी आपल्या मावशीच्या घरी मुक्कामी असून, साप्ताहिक सुट्टी असल्याने ती घरी परतणार होती. मात्र, सकाळी फिरायला गेलेल्या ग्रामस्थांना या तरुणीचा मृतदेह आढळला. आपल्या गावातील तरुणीचा मृतदेह असल्याची खात्री पटल्यानंतर गावात खळबळ उडाली. तिच्या गळ्यावर आणि हात, पायावर चाकूने वार केलेले होते. तर शरीरावर चटके दिल्याच्या खुणा होत्या. ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस पाटलांना सांगितले. त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजरत्न आठवले यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी पाहणी केली. तरुणीच्या गळ्यावर, हात आणि पायांवरील जखमांवरून तिचा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी बुलडाण्यावरून श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण केले. घटनेचा पंचनामा केला. मारेकऱ्याचा शोध घेतला जात आहे. हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. अहवालानंतरच हे स्पष्ट होणार आहे. पुढील तपास अंढेरा पोलीस करत आहेत.

Leave a Reply