मुंबईः १६ एप्रिल -मुंबई येथील हाफकिन इन्स्टिट्यूटला भारत बायोटेक कडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने करोनाप्रतिबंधक कोव्हॅक्सिन लस बनविण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसं ट्वीटच त्यांनी केलं आहे. राज्यात करोना रुग्णांची वाढती संख्या व लसीचा तुटवडा याबाबत काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहलं होतं. त्यात प्रामुख्यानं पाच मागण्या केल्या होत्या. तसंच, लशींचा पुरवठा वेळेत होण्यासाठी हाफकिन व हिंदुस्थान अँटिबायोटिक आदी अन्य संस्थांना लस उत्पादन करण्यासाठी मुभा द्यावी. अशी मागणीही त्यांनी केली होती. अखेर केंद्र सरकारने याबाबत काल निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज ठाकरेंनी पंतप्रधानांना उद्देशुन एक ट्वीट केलं आहे. तसंच, त्यांनी एक केंद्र सरकारला एक आवाहनही केलं आहे. १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाॅॅफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत. याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तर, केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण या संकटावर सहज मात करु हे नक्की, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
000000000000000