राम कदम यांना घराबाहेर पडण्यास पोलिसांची मनाई

मुंबई : १६ एप्रिल – गेल्या वर्षी याच दिवशी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका गावात जमावाने तीन साधूंची (Palghar Sadhu Mob Lynching) हत्या केली होती. त्या घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं असून याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी भाजप नेते राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांना नोटीस बजावली आहे. साधुंच्या झालेल्या हत्येप्रकरणी त्याना न्याय मिळवून देण्यासाठी राम कदम पालघर याठिकाणी जायला निघाले होते. दरम्यान मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस (Mumbai Police issued notice) बजावली असून घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.
पालघर जिल्ह्यातील गडचिंचोले या गावात गेल्यावर्षी 16 एप्रिल रोजी दोन हिंदू साधुची आणि त्यांच्या वाहनचालकाची ग्रामस्थानी हत्या केली होती. या हत्येप्रकरणी गावातील 115 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये 9 अल्पवयीन आरोपींचा देखील समावेश आहे. ऐन कोरोना लॉकडाऊनच्या काळात घडलेल्या या हत्याकांडानंतर शिवसेना पक्षाला भारतीय जनता पक्षानं चांगलंच टार्गेट केलं होतं. या हत्येचं पडसाद देशभर उमटले होते. पंतप्रधान मोदींपासून अनेक वरिष्ठ नेत्यांनी यावर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या.
यानंतर महाराष्ट्र हा साधू संतासाठी सुरक्षित नाही, असा सूरही उमटला होता. या दुर्दैवी घटनेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर राम कदम पालघर जिल्ह्याचा दौरा करणार होते. पण कोरोना विषाणूची परिस्थिती लक्षात घेता, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राम कदम यांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबतची नोटीस मुंबई पोलिसांनी राम कदमांना बजावली आहे. 16 एप्रिल 2020 रोजी, 70 वर्षीय चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी आणि 35 वर्षीय सुशीलगिरी महाराज आपल्या 30 वर्षीय वाहन चालक निलेश तेलगडे सुरत याठिकाणी जात होते. देशात लॉकडाऊन असल्यानं जागोजागी विविध निर्बंध होते. अशात गुरू श्री महंत रामगिरी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित साधु पालघर मार्गे जात होते. यावेळी रात्री दहाच्या सुमारास गडचिंचोले गावातून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांची गाडी अडवली आणि चोर समजून जमावाने त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणी दोन साधुंसह चालकाचा दुर्दैवी अंत झाला होता.

Leave a Reply