पोटच्या मुलाने विश्वासघात केल्याप्रकरणी आईची पोलिसात तक्रार


अकोलाः १६ एप्रिल– पैशांच्या हव्यासापोटी पोटच्या मुलानेच आपल्या वृद्ध आईचा विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार अकोला येथे उघडकीस आला आहे. बँकेतील जॉइंट अकाउंटमधून मुलाने परस्पर २६ लाख ५० हजार रुपये काढले. फसवणूक केल्याप्रकरणी आईने मुलाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बँक खात्यातून पैसे काढल्याची माहिती आईला समजल्यानंतर तिला धक्काच बसला. तिने मुलाविरोधात शहरातील खदान पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चौकातील आसरा कॉलनी येथील रहिवासी रुक्मिणी सुभाष साठे ;वय ६० या सेवानिवृत्त आहेत. अंबिका नगर येथे त्यांच्या मालकीचे घर होते. हे घर विकून अर्धे पैसे देतो, असे मुलाने तिला सांगितले. मुलगा कपिल याने ८ फेब्रुवारी रोजी आगर येथील दत्तात्रय गुलाबराव वावरे यांना ३७ लाख ५० हजार रुपयांना ते घर विकले. त्यानंतर त्याने आई रुक्मिणी आणि त्याच्या नावाने एमजी रोड येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेत जॉइंट अकाउंट उघडले. त्यात संपूर्ण रक्कम जमा केली. मात्र कपिलने याबाबत मला कोणतीही माहिती न देता माझी फसवणूक करून विश्वासघात केला. अशी तक्रार रुक्मिणी साठे यांनी पोलिसांत दिली.
२६ फेब्रुवारी रोजी १५ लाख ५० हजार रुपये खात्यातून काढले, तर ११ लाख रुपये आरटीजीएस करून त्याच्या पत्नीच्या खात्यात परस्पर वळवले, असे रुक्मिणी यांनी तक्रारीत म्हटले आहे. मुलाने घर विकून अर्धी रक्कम देण्याचे मान्य केले. पण एक पैसाही मला दिला नाही व माझी फसवणूक केली, असेही तिने सांगितले. अखेर तिने फसवणूक केल्याप्रकरणी मुलाविरोधात खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीवरून आरोपी मुलगा कपिलविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत
00000000000000

Leave a Reply