दक्षिण आफ्रिकेच्या माजी क्रिकेट कर्णधाराचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार?

मुंबई : १६ एप्रिल – दक्षिण आफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डीव्हिलियर्स याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत मागच्या वर्षांपासूनच चर्चा सुरु आहे. कोरोना व्हायरसमुळे ऑस्ट्रेलियात होणारा टी 20 वर्ल्ड कप रद्द झाला आणि ही चर्चा बंद झाली होती. आता पुन्हा एकदा या विषयावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या टीमचे हेड कोच मार्क बाऊचर यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याबाबत डीव्हिलियर्सशी सुरु असलेली चर्चा पूर्ण संपलेली नाही.तो आयपीएल 2021 साठी भारतामध्ये येण्यापूर्वी देखील या विषयावर त्याच्याशी चर्चा झाली आहे, असं बाऊचर यांनी सांगितलं.
या विषयावर बोलताना मार्क बाऊचर यांनी सांगितलं की ,” मी त्याला (डीव्हिलियर्स) खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला आहे. आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर त्याच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे.” 37 वर्षांच्या डीव्हिलियर्सनं आयपीएल सुरुवात जोरदार केली आहे. त्यानं पहिल्या मॅचमध्ये आरसीबीकडून खेळताना मुंबई इंडियन्स विरुद्ध 27 बॉलमध्ये 48 रन काढले होते.
डीव्हिलियर्स तीन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रिटायर झाला होता. त्यानं दक्षिण आफ्रिकेसाठी 114 टेस्टमध्ये 50 पेक्षा जास्त सरासरीनं 8765 रन केले आहेत. यामध्ये 22 शतक आणि 46 अर्धशतकांचा समावेश आहे. डीव्हिलियर्सनं 228 वन-डेमध्ये 53 पेक्षा जास्त सरासरीनं 22 शतक आणि 53 अर्धशतकांच्या मदतीनं 8765 रन केले आहे. त्यानं आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 1762 रन काढले आहेत.
आयपीएलमध्येही डीव्हिलियर्सचा रेकॉर्ड तगडा आहे. त्यानं 171 मॅचमध्ये 151 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं 4898 रन काढले आहेत. आयपीएल स्पर्धेत त्याच्या नावावर 3 शतक आहेत. क्रिकेट विश्वात ‘मिस्टर 360’ म्हणून प्रसिद्ध असलेला डीव्हिलियर्सनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं तर आगामी टी 20 वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेला मोठा फायदा होणार आहे.

Leave a Reply