गटाराच्या डंपरमध्ये स्वतःला कोंडून प्रहार संघटनेचे आंदोलन

वर्धा : १६ एप्रिल – आर्वी शहरात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असून ठिकठिकाणी रस्ते फोडून ठेवले आहेत. बऱ्याचदा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक प्रहार संघटनेचे बाळा जगताप यांनी आज गटाराच्या डंपरमध्ये स्वत:ला कोंडून घेत आंदोलन केले.
शहरात भूमिगत गटार योजनेचे काम चालू आहे. काम करीत असताना शहरातील अनेक रस्ते हे पूर्वरत करणे गरजेचे होते. परंतु, असे न करता थातुरमातुर माती मुरुम टाकून बुजवण्यात आले. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या रेती भरलेले मोठे टिप्पर विनापरवाना शहरातील रस्त्यावरून धावत असल्याने रस्ते पूर्णत: खराब झाले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून त्यावरुन चालणे दुरापास्त झाले आहे.
यासंदर्भात प्रहारच्या वतीने वेळोवेळी निवेदन देण्यात आली. परंतु, सुस्त प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. प्रशासनाला जाग आणण्यासाठी बाळा जगताप यांनी गटाराच्या डंपर मध्येच स्वःला कोंडून घेत अनोख्या आंदोलनाचा मार्ग निवडला. यावेळी नगर पालिकेचे मुख्याधिकारी, महसूल प्रशासनाचे अधिकारी यांनी आंदोलन स्थळाला भेट घेत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सोबत बैठक बोलावली असून या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र समस्येवर तोडगा न निघाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल असे बाळा जगताप यांनी सांगितले.

Leave a Reply