मुंबई : १६ एप्रिल – देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ आहे. अशात आता चिंतेत आणखी भर टाकणारी बातमी समोर आली आहे. कोरोनाबाबत अभ्यास करणाऱ्या तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की येत्या काही दिवसात कोरोना पीकवर असेल. कोरोनाबाबत नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी सांगितलं, की पुढचे चार आठवडे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. तर, आयआयटी कानपूर टीमनं गणितीय मॉडेलच्या आधारे कोरोना 20 ते 25 एप्रिलदरम्यान पीकवर असेल असं म्हटलं आहे.
आयआयटी कानपूरचे प्राध्यापक मनिंद्र अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा अधिक भयंकर असल्याचं चित्र आहे. 15 एप्रिल म्हणजेच गुरुवारी कोरोनानं नवीन उच्चांक गाठला आहे. अजूनही संकट कमी झालेलं नाही. आमच्या टीमनं कोरोनावर गणितीय मॉडेलच्या आधारे लक्ष ठेवलं आहे. यानुसार, 20 ते 25 एप्रिलदरम्यान कोरोना पीकवर असणार आहे. यानंतर काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरुवात होईल.
अग्रवाल यांनी सांगितलं, की 25 एप्रिलनंतर कोरोनापासून दिलासा मिळण्यास सुरुवात होईल आणि अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, मे अखेरपर्यंत स्थिती सामान्य होण्यास सुरुवात होईल. अग्रवाल म्हणाले, की सर्व राज्यांमध्ये स्थिती सामान्य दिसून येईल. जिथे कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे, तिथेही मे अखेरपर्यंत परिस्थिती सामान्य होऊ लागेल. सध्याची लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी आहे, कारण यावेळी दररोजचा मृत्यूदर बाधितांच्या प्रमाणानुसार मागील वेळीपेक्षा कमी आहे. लस आल्यानंतर लोकांनी हलगर्जीपण केल्यानं रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे.
अग्रवाल म्हणाले,की यावेळी मृत्यूचा आकडा कमी असल्यानं काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मागील वेळी देशात जेव्हा एक लाख कोरोना केस झाले होते, तेव्हाही मृत्यूचा आकडा एका हजाराच्या जवळपास होता. यावेळी दिवसाला दोन लाख रुग्ण आढळत असतानाही आकडा एक हजारापर्यंतच पोहोचला आहे. मागच्या दोन महिन्यांच कोरोनाचा प्रसार 30 टक्के वाढला आहे.