वाघाच्या हल्ल्यात वन मजूर गंभीर जखमी

चंद्रपूर : १५ एप्रिल – वन परिक्षेत्रांतर्गत गिरगाव बिट क्रमांक 535 संरक्षित जंगल क्षेत्रात सिंधी काढायला गेलेल्या मजुरावर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवार, 14 एप्रिल रोजी सकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. सुरेश पुंडलिक गुरुनुले (50, रा. गिरगाव) असे जखमी मजुराचे नाव आहे. गिरगाव येथील सुरेश गुरुनुले हे सकाळच्या सुमारास गावाजवळील जंगल परिसरात सिंधी काढायला गेले असता वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यात त्यांच्या डोक्यावर मोठी जखम झाली. त्यांना सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. यापूर्वी गोविंदपूर वनक्षेत्रात 13 एप्रिल रोजी विक्राबाई खोब्रागडे (65) हिच्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. तर, कोजबी येथील देविदास खरकाडे यांचासुध्दा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. 15 दिवसात वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघाला जेरबंद करण्याची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचार्यांनी घटनास्थळी पोहचून वाघाचा बंदोबस्त करण्याची मोहीम आखली आहे.

Leave a Reply