लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी नागपूरकरांनी दिला चांगला प्रतिसाद

नागपूर : १५ एप्रिल – ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लागू केलेल्या कडक निर्बंधांसह लॉकडाऊनला नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. सकाळपासून नागपूर शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे चित्र आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता इतर फारसे नागरिक रस्त्यांवर विनाकारण फिरताना दिसले नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे शहरात पोलिसांचा फारसा बंदोबस्त नसताना नागरिकांनी दिलेला प्रतिसाद कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महत्त्वाचा सिद्ध होत आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी लागू केल्या लॉकडाऊन दरम्यान नागपूर पोलिसांसाठी पुढील पंधरा दिवस 24 तास लक्ष असेल. बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदीला सुरुवात झाली. तेव्हाच नागपूर पोलिसांनी रस्त्यांवर उतरुन कारवाईला सुरुवात केली होती. एवढंच नाही तर रात्रीची गस्त देखील वाढवण्यात आलेली आहे. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांना अडवून वाहनचालकांवर कारवाईदेखील केली जात आहे. मात्र, आज सकाळपासूनच नागपूरकरांनी लॉकडाऊन मनावर घेतल्याने पोलिसांना फारशी मेहनत करावे लागत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. नागपूर शहरात आणि जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती अतिशय भीषण झालेली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाची जीवघेणी साखळी तोडण्यासाठी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधांना नागपूरकरांनी सहकार्य करावे, ज्यामुळे प्रत्येक नागरिक सुरक्षित राहील असे आवाहन जनप्रतिनिधींनी केले आहे.

Leave a Reply