रशियाच्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात

नवी दिल्ली : १५ एप्रिल – रशियाच्या करोना प्रतिबंधक ‘स्पुटनिक व्ही’ लशीची आयात चालू तिमाहीत सुरू होणार आहे. यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने तयारी सुरू केली आहे. एप्रिलअखेरपर्यंत ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या आयातीची प्रक्रिया सुरू करण्यात येईल. मात्र, या लसमात्रा वापरास उपलब्ध कधी उपलब्ध होतील, याचा निर्णय सरकारवर अवलंबून असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. या लशीच्या साठवणुकीसाठी असलेली उणे १८ अंश सेल्सिअसची अवस्था २ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत नेण्याची तयारी होत असल्याचे या औषध उत्पादक कंपनीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.

ही लस रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडाकडून (आरडीआयएफ) आयात केली जाणार असून, भारताला लशीच्या १२५ दशलक्ष मात्रा पुरवण्याच्या करारांतर्गत उणे १८ ते उणे २२ अंश तापमान कायम राखून त्या येथे आणल्या जातील, असे डॉ. रेड्डीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक सप्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुण्यात करोना रुग्णांसाठी जम्बो रुग्णालय, नागपुरात का नाही

डॉ. आशिष देशमुख यांचा सवाल

नागपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात करोना रुग्णांसाठी जम्बो रुग्णालय उभारले, पण करोना साथीला १४ महिने होऊन देखील नागपुरात जम्बो तर सोडा साधे कोव्हिड रुग्णालय उभारण्यात आले नाही. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे प्रतत्न कमी पडत असल्याचे हे घोतक आहे, अशी टीका माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केली.

ते म्हणाले, प्रशासन हतबल दिसत आहे. मुंबई, पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्यात आले. नागपुरात क्रीडा संकुलात पाच हजार खाटांचे जम्बो रुग्णालय होणार होते. त्याची घोषणा झाली होती. पण, अजूनही उभारण्यात आले नाही. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत त्यासाठी प्रयत्न करत असले तरी त्यांना तेवढा निधी आणि मदत मिळत नसेल तर त्यांचे प्रयत्न कमी पडत आहेत.

त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री आणि उपमुख्यत्री नागपूर आणि विदर्भावर लक्ष देणार नाही तोपर्यंत येथील परिस्थिती सुधारणे कठीण आहे. विदर्भात करोनाची दुसरी लाट सुरू होऊन दोन महिने झाले. लोक रस्त्यावर मरत असताना जम्बो रुग्णालय उघडत नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विदर्भातील आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यावर दबाव निर्माण करून नागपूर आणि विदर्भातील रुग्णांना खाटा, प्राणवायू, व्हेंटीलेटर, रेमडीसवीर पुरवण्याचे प्रयत्न करावे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.

Leave a Reply