नितीन गडकरी – संवेदनशील लोकप्रतिनिधी

संपादकीय संवाद

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले आहे. यावेळी काय करावे? हे कुणालाच सुचेनासे झालेले आहे त्यामुळे राजकीय गोटातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांमध्येही परस्परांना जबाबदार धरत टीका करणे हाच उद्योग जोरात सुरु आहे. 

अशा वेळी राजकारण बाजूला  ठेऊन समस्या कशी सोडवावी या दृष्टीने एखादा राजकीय नेता विचार आणि प्रयत्न करत असेल तर जनसामान्यांना ते सुखावणारेच ठरते परस्परांवर दुगाण्या तर सर्वच झाडतात पण कुणीतरी त्यापुढे जाऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो आहे ही बाब निश्चितच कौतुकास्पद ठरते.

देशाच्या मंत्रिमंडळातील एक प्रमुख मंत्री आणि नागपूरचे लोकसभेतील खासदार नितीन जयराम गडकरी हे असेच राजकारणाच्या पुढे जाऊन विचार करणारे आणि जनसामान्यांच्या समस्या सोडवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात महाराष्ट्रात कोरोनाचा अगदी कहर  झाला आहे.  रोज हजारोंनी रुग्ण वाढत आहेत. त्यांना रुग्णालये उपलब्ध नाहीत रुग्णालयात जागा मिळालीच तर देण्यासाठी औषधे उपलब्ध नाहीत, रुग्णांसाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमेडिसिवीर हे इंजेक्शन उपलब्ध नाही प्रतिबंधात्मक लसींचाही तुटवडा आहे. अशा वेळी राज्याचे मुख्यमंत्री केंद्र सरकारवर टीका करण्यात धन्यता मानत आहेत. त्यांच्या मित्रपक्षाचे नेतेही तेच करताहेत. दिल्लीत भाजपचे सरकार आहे आणि मुंबईत तीन भाजपविरोधक एकत्र येऊन सरकार बनवले आहे त्यामुळे भाजपला जास्तीत जास्त कसे बदनाम करता येईल हाच त्यांचा प्रयत्न राहिला आहे. त्याच्या उत्तरात राज्यातील भाजप नेते महाआघाडीच्या नेत्यांना जबाबदार धरत त्यांच्यावर टीकास्त्र सोडत आहेत या गोंधळात  सामान्य रुग्णांचे मात्र मरण ओढवले आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे नितीन गडकरी हे संवेदनशील व्यक्ती असल्यामुळे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतात. नागपूर शहरातील ढासळती आरोग्यव्यवस्था गडकरींना दुखावणारी ठरली. त्यांनी आपल्या कार्यालयातील दोन अधिकऱ्यांवर जबाबदारी सोपवली त्यांचे मोबाईल नंबर्स जाहीर केले आणि कोणत्याही रुग्णाला बेड मिळत नसल्यास या दोन अधिकाऱ्यांशी  सम्पर्क करा असे आवाहन केले या अधिकाऱ्यांनी अनेक गरजूंना बेड मिळवून दिल्याची माहिती आहे.  रेमेडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा हादेखील त्यांना अस्वस्थ करून गेला अस्वस्थ गडकरींनी नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला त्यांच्याशी चर्चा केल्यावर थेट रेमेडिसिवीर बनवणाऱ्या कारखानदारांना त्यांनी फोन केला आणि नागपुरात ताबडतोब १० हजार इंजेक्शन्स उपलब्ध द्या असा त्यांनी आग्रह धरला गडकरींचा शब्द सर्वसाधारणपणे कारखानदार टाळत नाहीत. ताबडतोब हालचाली झाल्या आणि २४ तासात ५ हजार इंजेक्शन्स अम्प्युल नागपुरात पोहोचल्या अजून १० हजार येण्यात आहेत.

त्यानंतर गडकरींनी काल शासकीय यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेतली नागपुरात अतिरिक्त बेड्स कुठे उपलब्ध करता येतील याची चाचपणी केली नॅशनल कँसर इन्स्टिट्यूट मध्ये नवीन ४०० बेड्सची व्यवस्थाही केली. शहरात व्हेंटीलेटर्सचा तुटवडा असल्यामुळे ते त्या कारखानदारांशीही बोलले परिणामी हजार व्हेंटीलेटर्स येण्याची सोय झाली आहे. ऑक्सिजन सिलिंडरसाठीही गडकरींनी शब्द टाकून हजार सिलिंडर्सची तातडीने सोय केली आहे. एकूणच वैद्यकीय व्यवस्था मार्गी कशी लावता येईल याचे संपूर्ण नियोजन त्यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी एका काँग्रेस नेत्याने टीका केली होती गडकरी गेली अनेक वर्षे नागपूरच्या राजकारणात सक्रिय लोकप्रतिनिधी म्हणून वावरले आहेत मात्र, त्यांनी शहरात एकही मोठे हॉस्पिटल उभारले नाही असा आरोप करण्यात आला होता. मात्र एम्स सारखे अत्याधुनिक हॉस्पिटल आणि संशोधन संस्था  हे गडकरींच्याच दूरदृष्टीचे फलित आहे हे हा नेता विसरला. आजही काँग्रेसचे प्रवक्ते नागपूरकर अतुल लोंढे यांचे पत्रक वाचण्यात आले. नागपुरात कोरोनाने कहर केला असतांना गडकरी आणि फडणवीस कुठे आहेत असा सवाल लोंढे यांनी केला आहे. मात्र ज्यावेळी आपल्या नंदनवन परिसरातील बंगल्यात बसून अतुल लोंढेंनी हे पत्रक काढले त्यावेळी गडकरी आणि फडणवीस नॅशनल कँसर इन्स्टिट्यूट आणि एम्स या परिसरात  रुग्णव्यवस्थेचा आढावा घेत होते हे लोंढेंना बहुतेक माहीतच नव्हते.

अविनाश पाठक    

Leave a Reply