कोरोनाचा कहर , ५८१३ नवीन बाधित तर तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १५ एप्रिल – कोरोनाचा कहर नागपूर शहरात बराच वाढला असून प्रशासन कोरोनासमोर हतबल झालेले दिसत आहे. प्रशासन करत उपाययोजना रुग्णसंख्या कमी करायला तोकड्या पडत आहेत. नागपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या ३ लाखाच्या घरात गेली आहे. रुग्णवाढीचा वेग बघता उद्या नागपुरातील रुग्णसंख्या ३ लाखांचा आकडा पार करेल यात शंका नाही. तसेच मृत्युसंख्येनेही आज ६ हजाराचा टप्पा पार केला आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ५८१३ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत तर दुसऱ्या लाटेतील सर्वाधिक ७४ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
केंद्र सरकारपासून सर्वच स्तरावर कोरोना रुग्णसंख्या कमी करणे आणि कोरोनामुळे होणारी हानी थांबविण्याकरिता पुरजोर प्रयत्न केले जात आहेत परंतु प्रशासनाच्या कुठल्याच प्रयत्नाला यश येत नाही आहे. सर्वच शहरात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. नागपूरसारख्या शहरात तर कोरोनाने थैमान घातले आहे. गेल्या २४ तासात नागपूर शहरात ५८१३ नवीन बाधित रुग्णांची नोंद झाली असून आजच्या रुग्णांमध्ये २३५० ग्रामीण भागातील ३४५८ शहरातील तर ५ रुग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. एकूण कोरोना रुग्णांचा आकडा २९९८४९ वर पोहोचली आहे. शहरात आज तब्बल ७४ रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यात ३० मृत्यू ग्रामीण भागातील ३९ शहरातील तर ५ मृत्यू इतर जिल्ह्यातील रुग्णांचे झाले आहेत एकूण मृत्युसंख्या ६०३४ वर पोहोचली आहे.
नागपूर जिल्ह्यात आज २२५७५ चाचण्या घेण्यात आल्या असून त्यात ७४०२ चाचण्या ग्रामीण भागात तर १५१७३ चाचण्या शहरात घेण्यात आल्या आहेत. ४६३४ रुग्ण आज कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २३२७०५ वर पोहोचली आहे तर कोरोना बरे होण्याचे प्रमाण ७७.६० टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात सध्या ६१११० ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण असून त्यात २१७२० ग्रामीण भागातील तर ३९३९० शहरातील रुग्ण आहेत.

Leave a Reply