मुंबई : १५ एप्रिल – आयपीएलच्या सातव्या सामन्यामध्ये आज गुरुवारी दिल्ली कॅपिटल्सचा मुकाबला राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. विशेष म्हणजे या हंगामात पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवणारे यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत (दिल्ली) आणि संजू सॅमसन (राजस्थान) आमने-सामने येत आहेत. दिल्लीने चेन्नईला हरवत हंगामातील विजयी सुरुवात केली. तर राजस्थानला आपल्या पहिल्या सामन्यात पंजाब विरुद्ध खेळताना थोड्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला होता.दिल्लीचा आफ्रिकन वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्कियाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तो सलग दुसरा सामना खेळू शकणार नाही. कागिसो राबाडा आणि लिहाजा एहतियाना हे देखील त्याच्या संपर्कात आल्याने त्यांना विलगीकरणात आहेत. अक्षर पटेलही कोरोनाचा सामना करत असल्याने तोही या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. राजस्थानची टीम सध्या तरी कोरोनामुक्त आहे, मात्र अष्टपैलू खेळाडू बेन स्टोकच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे तो पूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे.बेन स्टोक संघाबाहेर जाणे हे राजस्थानसाठी महागडे ठरू शकते. सध्या तरी त्याच्या जागी त्याच्या एवढा तोडीस-तोड खेळाडू राजस्थानकडे नाही. आजच्या सामन्यात त्याच्याऐवजी इंग्लंडच्या लियाम लिविंगस्टोनला संधी मिळण्याची शक्यता आहे. ‘बिग बॅश’ सीरिजमध्ये त्याने चांगली कामगिरी केली होती. या सीरिजमध्ये त्याने 28 षटकार लगावले होते. त्यामुळे राजस्थानला त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
राजस्थानच्या फलंदाजांना स्वैर फटकेबाजी करू न देता जखडून ठेवण्याची जबाबदारी दिल्लीच्या आवेश खान आणि ख्रिस वोक्सवर असेल. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. मात्र, राजस्थानकडे देखील चांगल्या फलंदाजांचा भरणा असल्याने त्यांना रोखण्याचे आव्हान या दोघांवर असेल. दरम्यान, मैदानात दव पडत असल्याने आजच्या सामन्यात टॉस जिंकणारा कर्णधार पहिल्यांदा क्षेत्ररक्षण निवडण्याची शक्यता अधिक आहे.
दिल्लीचा संघ मार्कस स्टोईनिसचा वापर संजू सॅमसनविरूद्ध करू शकेल. स्टायनिसने सॅमसनला 12 चेंडू टाकले आणि 18 धावा देऊन दोनदा बाद केले आहे. तर रविचंद्रन अश्विन आणि अमित मिश्रा यांची जोडी दिल्लीसाठी फायदेमंद ठरू शकते. या दोघांनी मिळून राजस्थानविरुद्ध एकूण 46 बळी मिळवले आहेत.