अमरावती जिल्यात मायलेकी बनल्या सख्ख्या जावा

अमरावती : १५ एप्रिल –सख्खे भाऊ एकमेकांचे साडू होणं यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. मात्र, अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात मायलेकी सख्ख्या जावा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार व त्यामागील फसवाफसवी उजेडात आल्यानंतर तपासाअंती पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे.
दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून अश्लेषा रामाणे (बदललेले नाव) ही महिला आठ वर्षांपूर्वी एकुलत्या एका मुलीला घेऊन माहेरी परतली. माहेरच्या मंडळींचा आधार घेत तिनं आयुष्याची नव्यानं सुरुवात केली. लेकीच्या लग्नाचं स्वप्न बघत असतानाच स्वत:चा संसार थाटावा, अशी इच्छा अश्लेषाच्या मनात आली. त्यासाठी ‘आयडियाची कल्पना’ लढवत तिनं वेगळंच नाट्य गुंफलं. तिनं एका गावातील दोन भावांना गाठलं. आपली मुलगी ही आपली बहीण असल्याचं सांगून तिनं दोघींच्या लग्नाची इच्छा व्यक्त केली. घरात असलेली वृद्ध आई कोण, हा संशय येऊ नये म्हणून ती आपली मामी असल्याचं अश्लेषानं सांगितलं. अश्लेषाच्या गोड बोलण्याला हे दोघेही तरुण फसले. दोन्ही बहिणी एकाच घरात नांदणार असल्यानं त्यांनाही आनंद झाला. अखेर २५ फेब्रुवारी रोजी अश्लेषानं मोठ्यासोबत, तर अल्पवयीन असलेल्या तिच्या मुलीनं धाकट्यासोबत लग्न केलं.लग्नानंतर आई आणि मुलगी या दोघीही सख्ख्या जावा म्हणून एकाच घरात नांदू लागल्या. मात्र, महिना, दीड महिना होत नाही तोच हा प्रकार मुलीच्या वडिलांच्या लक्षात आला. त्यांनी तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. ठाणेदार अजय आखरे व बिट जमादार महादेव पोकळे यांनी घटनेचा तपास केला. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले व विधिज्ञ सीमा भाकरे यांचा तपासातून मुलगी ही अल्पवयीन असल्याचं समोर आलं. त्यानंतर ग्रामसेवकाच्या तक्रारीवरून तिच्याशी विवाह करणाऱ्या युवकाविरुद्ध व तिचं लग्न ठरवणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply