नागपूर : १४ एप्रिल – एका पोलिस शिपायाच्या घराला आग लावून झोपेत असलेल्या पत्नी आणि दोन मुलांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्ञानदीप कॉलनीजवळील सप्तकनगर येथे राहणारे राहुल चव्हाण हे शहर पोलिस दलात कार्यरत आहेत. सध्या ते शहर मुख्यालयात कार्यरत आहेत. चव्हाण यांची वानाडोंगरी येथील आयटीआय कोव्हिड सेंटर येथे ड्युटी लागली आहे. रात्री चव्हाण हे ड्युटीवर गेले होते. घरी पत्नी पूनम, मोठा मुलगा राघव (6) आणि लहान मुलगा केशव (3) असे हजर होते. पहाटे तीनच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चव्हाण यांच्या दारांना बाहेरून कडी लावली.
दरवाजा आणि घरावर रॉकेल ओतून आग लावली. घरात धूर झाल्याने पूनम यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना जाग आली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी दोन्ही मुलांना जागे केले. दोन्ही मुलांना स्नानगृहात नेले आणि त्या स्वयंपाक खोलीत आल्या. त्यावेळी स्वयंपाक खोलीतील साहित्य जळताना दिसले. पूनम यांनी शेजारी राहणारे नामदेव राठोड आणि राहुल यांच्या मोबाईलवर संपर्क साधून घराला आग लागल्याची माहिती दिली. राठोड आणि राहुल यांनी इतर शेजार्यांना जागे केले. शेजार्यांनी आग विझविली. शेजार्यांनी दार तोडून तिघाही मायलेकांना सुखरूपपणे बाहेर काढले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी 307 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.