नागपूर जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी ४ कोरोना रुग्णांचा मृत्यू

नागपूर : १४ एप्रिल – वेकोलि कन्हान-कांद्रीच्या जवाहरलाल नेहरू इस्पितळात उघडण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये सकाळी ऑक्सिजनअभावी चार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची हृदयदायक घटना घडली. मृतकांमध्ये अमित भारद्वाज (वय ३0), हुकुमचंद येरपुडे (वय ५७), कल्पना कडू (वय ३८), किरण गोरके (वय ४७) यांचा समावेश आहे.
घटनेनंतर संतप्त झालेले नातेवाईक व नागरिकांनी जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलची किरकोळ तोडफोड केली. यावेळी काही प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण, पोलिसांचा अतिरिक्त ताफा रुग्णालय परिसरात दाखल झाल्याने परिस्थिती निवळली. पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांच्या सूचनेवरून वेकोलिच्या कांद्री येथील जवाहरलाल नेहरू हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी कोविड सेंटर सुरू केले. सोमवारी या रुग्णालयात २९ कोरोना रुग्णांना उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांच्यापैकी अमित भारद्वाज (वय ३0), हुकुमचंद येरपुडे (वय ५७), कल्पना कडू (वय ३८), किरण गोरके (वय ४७) या चौघांचा सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णालयामध्ये ४८ बेड आहेत. ऑक्सिजन सिलेंडरचा साठाही भरपूर आहे. पण, तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव असल्याचे बोलले जात असून, यामुळेच चौघांचा बळी गेला असा आरोप करण्यात येत आहे. या रुग्णालयात एकाचवेळी चार रुग्णांचा मृत्यू हा अलीकडील काळातील पहिलीच घटना आहे. परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी व कन्हानचे ठाणेदार क्षीरसागर व कांद्री ग्रामपंचायतचे सरपंच बळवंत पडोळे यांनी परिस्थिती सांभाळण्याकरिता मोलाची भूमिका निभावली.

Leave a Reply