नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आज शुकशुकाट, कडेकोट पोलीस बंदोबस्त

नागपूर : १४ एप्रिल – राज्यात कोरोनाचे सावट असल्याने दीक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने आज साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येत आहे. ज्या दीक्षाभूमीवर दरवर्षी आलोट गर्दी असते, कानाकोपऱ्यातून लोक अभिवादन करण्यासाठी एकत्र येत असतात, या ठिकाणी आज सर्वत्र पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दीक्षाभूमीच्या मुख्य गेटसमोरील मार्गावर लोकांना येण्यासाठी रस्त्यावर वाहन नेण्यास बंदी घालण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्याला दीक्षाभूमी नागपूरचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई आणि सचिव सुधीर फूलझेले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सलामी देण्यात आली. तसेच स्तुपातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशालादेखील अभिवादन करत बुद्धवंदना घेण्यात आली. स्मारक समितीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवत हा कार्यक्रम पार पडला.
दीक्षभूमी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात
आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीक्षाभूमीच्या आतील जाण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे बाहेरून का होईना पण दर्शन घेण्यासाठी अनुयायी अभिवादन करण्यासाठी येऊन गेली. मात्र या ठिकाणी गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात आहे.

Leave a Reply