नागपुरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे मुख्यमंत्र्यांना उच्च न्यायालयाचे आदेश

नागपूर : १३ एप्रिल – नागपूर शहरात कोरोनाचा विस्फोट झाला आहे. आरोग्य यंत्रणा तोडक्या पडताहेत. ऑक्सिजन सिलेंडर्सचा तुटवडा पडत आहे. यासाठी दिवसाला ९०० ऑक्सिजन सिलिंडरची निर्मिती होऊ शकेल, या क्षमतेचा ऑक्सिजन प्लांट शहरामध्ये स्थापन करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुख्यमंत्र्यांना दिले. पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये समन्वय साधून लागणारा निधी उपलब्ध करून घ्यावा, असेही आदेशामध्ये नमूद केले.
उपराजधानीतील कोरोना स्थिती भयावह झाली आहे. याची गंभीरतेने दखल घेत उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात युद्धपातळीवर सर्व मिळून काम करा. तसेच रुग्णांसाठी बेड, रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सिलेंडर तत्काळ उपलब्ध करून द्या, असे आदेश सोमवारी न्यायालयाने सुनावणीदरम्यान दिले. शहरामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा भासणारा तुटवडा लक्षात घेता एफडीएच्या सहआयुक्तांचासुद्धा नागपूर कोविड-१९ समितीमध्ये (ही समिती न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन करण्यात आली आहे.) समावेश करून घेतला आहे. दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती लक्षात घेता उच्च न्यायालयाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी ठेवली. यादरम्यान, विविध समस्यांचा आढावा न्यायालयाने घेत आवश्यक आदेश दिले. ऑक्सिजन सिलिंडरच्या बाबतीत तातडीने लक्ष घालत प्लांटची क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक पावले उचलावे, अशा सूचना उच्च न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना दिल्या. तसेच याबाबत कोणता निर्णय घेतला, यावर उद्या सकाळी उत्तर दाखल करण्याचे आदेश पालकमंत्र्यांना दिले. शिवाय गरजू रुग्णांना ते उपलब्ध व्हावे म्हणून उद्यापर्यंत उपाययोजना आखा, असेही न्यायालयाने आदेशामध्ये स्पष्ट केले. तसेच, तोसीनिझुमाव इंजेक्शनचा तयार झालेला कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार कोणी केला, यावर उद्या (ता. १३) पयर्ंत अहवाल दाखल करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना दिले. कोरोना बाधितांवर उपचार करणार्या रुग्णालयांतील डॉक्टर व परिचारिकांना सुरक्षित असल्याची खात्री वाटावी म्हणून आवश्यक पोलिस बळ पुरवावे. सोबतच रुग्णालयामध्ये गोंधळ घालणार्या रुग्णांच्या नातेवाइकांवर पोलिस प्रशासनाने कारवाई करावी, असेही न्यायालयाने नमूद केले.न्यायालयीन मित्र म्हणून अँड. श्रीरंग भांडारकर, असिस्टंट सॉलिसिटर जनरल उल्हास औरंगाबादकर, वरिष्ठ विधिज्ञ एम. जी. भांगडे व अँड. डी. पी. ठाकरे, अँड. सुधीर पुराणिक यांनी विविध पक्षकारांतर्फे कामकाज पाहिले. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती झेड.ए. हक आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
काही गंभीर रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन आवश्यक आहे.त्यांना ती इंजेक्शन्स मिळत नाहीत.गरजू रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन न मिळाल्यामुळे काही उपद्रवी बेकायदेशीर कृती करत आहेत. काही व्यक्ती वेगवेगळ्या डॉक्टरांकडून एका रुग्णाच्या नावे रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी लिहून घेत आहेत आणि ते काळाबाजारात विकत आहेत रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलावे. तोसीनिझुमाव इंजेक्शन खासगी फार्मासिस्टच्या काउंटरवर मोठय़ा दराने विकल्या जाते. तोसीनिझुमाव इंजेक्शनचा तयार झालेला कृत्रिम तुटवडा आणि काळाबाजार कोणी केला, ही इंजेक्शन्स अचानक बाजारातून गायब झाली आहेत असे प्रश्न उपस्थित करत,असे काम करणार्यांवर कायद्यानुसार कारवाई करावी असे आदेश न्यायालयाने दिले.

Leave a Reply