दहावी, बारावीची परीक्षा रद्द करावी – अरविंद केजरीवाल यांची केंद्राला विनंती

नवी दिल्ली : १३ एप्रिल – कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला कोरोनाचा हॉटस्पॉट बनवण्यापासून वाचवायचं असेल तर या परीक्षा रद्द कराव्या, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. लाखो विद्यार्थी आणि सुमारे एक लाख शिक्षक परीक्षेच्या प्रक्रियेत सहभागी होणं म्हणजे राजधानी दिल्ली कोरोनाचा हॉटस्पॉट बनेल आणि त्यानंतर परिस्थिती हाताळणं कठीण होईल.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीमध्ये सहा लाख विद्यार्थी सीबीएसईची परीक्षा देणार आहे. तर सुमारे एक लाख शिक्षक परीक्षा घेतील. यामुळे दिल्लीत कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होईल. माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, सीबीएसई परीक्षा रद्द करण्यात यावी.”
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्याऐवजी दोन पर्यायही सुचवले आहेत. ते म्हणाले की, इंटर्नल असेसमेंट किंव ऑनलाईन परीक्षेचा पर्याय आहे. यंदा विद्यार्थ्यांना याच पद्धतीने पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला जावा. जगातील अनेक देशांचं उदाहरण पाहत होतो, त्यांनी दुसऱ्या लाटेत परीक्षा रद्द केली आहे. आपल्या देशातील अनेक राज्यांनी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.”
दिल्लीत सलग तिसऱ्या दिवशी दहा 10 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी (12 एप्रिल) दिवसभरात 11 हजार 491 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 72 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. काळजीची बाब म्हणजे इथला पॉझिटिव्हिटी रेट वाढून 12.44 टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. आता दिल्लीत एकूण 12 हजार 008 कोविड बेड आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत त्यापैकी 5 हजार 068 बेड रिकामे होते.

Leave a Reply