जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? – भाजपची मुख्यमंत्र्यांना विचारणा

मुंबई : १३ एप्रिल – वसई-विरार शहरात काल (सोमवार) तब्बल ११ करोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही रुग्ण ऑक्सिजन न मिळाल्याने दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. यात नालासोपाऱ्यातील विनायका हॉस्पिटलमध्ये ७ रुग्णांचा समावेश आहे. या धक्कादायक घटनेवरून राज्यातील विरोधी पक्ष भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का?” असा सवाल भाजपाकडून विचारण्यात आला आहे.
तसेच, भाजपा नेत्यांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात असून, आरोग्यमंत्र्याच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकारपरिषद घेत महाविकासआघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
पत्रकारपरिषदेत बोलताना केशव उपाध्ये म्हणाले, “एकीकडे राज्यात करोनाने हाहाकार माजवला असून, दुसरीकडे राज्यसरकारला करोना परिस्थिती हाताळण्यात अपयश येत आहे. तर, तिसरकडे जेथे करोनाबाधितांवर उपाचर सुरू आहेत अशा अनेक केंद्रांमध्ये रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा देखील तुटवडा निर्माण झाला आहे. काल ११ लोकं मृत्यूमुखी पडणं हे खूप धक्कादायक आहे, अस्वस्थ करणारं आहे. भाजपाचा असा आरोप आहे, हे करोनाचे जे बळी काल ऑक्सिजन अभावी गेलेत हे राज्य सरकारच्या अनास्थेपाई, राज्यातील महावसूली सरकारच्या अनास्थेतून, दुर्लक्षातून व हेळसांडपणातू गेलेले हे बळी आहेत. अजून नेमके किती बळी या सरकारला हवेत? हा खरंतर अत्यंत गंभीर प्रश्न आहे.”
तर, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे नालासोपाऱ्यात झालेल्या या मृत्यूला जबाबदार कोण आहे? जनतेचा जीव म्हणजे तुमच्यासाठी कवडीमोल झाला आहे का? फेसबुक लाईव्हवर मोठंमोठ्या गप्पा मारणारे उद्धव ठाकरे आता या प्रकरणावर काही बोलतील का? राज्यातील ठाकरे सरकार आणि वसुली या एकाचं नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत. ठाकरे सरकारच्या या भ्रष्ट कारभाराची शिक्षा आज राज्यातील जनतेला भोगावी लागत आहे. कुठे रेमडेसीवीरचा काळाबाजार तर कुठे आरोग्य अधिकारीच व्हेंटिलेटरसाठी लाच घेत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री उद्धव ठाकेर यांच्या मते सर्व आलबेल आहे !” असं भाजपाकडून ट्विटद्वारे म्हटलं गेलं आहे.

Leave a Reply