शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार नाही – संजय राऊत

मुंबई : ४ मार्च – पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेना ताकद आजमावून पाहणार, अशी चर्चा सुरू होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी, शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केलं आहे.  

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. राज्यात आचरसंहिता लागू आहे. बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशात बिहारमध्ये शिवसेनेने काही जागा लढवल्याने, बंगालमध्ये देखील शिवसेना निवडणूक लढवणार, अशा चर्चांना ऊत आला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी ट्विट करत, शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर केले आहे. राऊत यांच्या या घोषणेनंतर चर्चांना पूर्णविराम मिळाला.  

शिवसेना बंगालमध्ये निवडणूक लढवणार की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत झालेल्या चर्चेनंतर याबद्दलची माहिती मी तुम्हाला देत आहे, असे राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्याची परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण आहेत, असे राऊत यांनी ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.

दरम्यान, बंगालमध्ये ८ टप्प्यात विधानसभा निवडणूक होत आहेत. यातील पहिला टप्पातील मतदान २७ मार्चला तर अखेरच्या आठव्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीचा निकाल २ रोजी जाहीर केला जाणार आहे. 

Leave a Reply