मोहन डेलकर प्रकरणी सुप्रिया सुळेंनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट

मुंबई : १० मार्च – दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची महाराष्ट्र सरकारने एसआयटी मार्फत चौकशी सुरू केली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचे लक्ष वेधले आहे. प्रमुख विरोधी पक्षांच्या खासदारांसह सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली व त्यांना आपल्या मागणीचे पत्र दिले. 

खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. डेलकर यांनी सुसाइड नोटमध्ये दादरा आणि नगर हवेली येथील प्रशासकांवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेवरून महाराष्ट्राच्या विधीमंडळात मंगळवारी जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. त्यानंतर याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एसआयटी मार्फत चौकशीची घोषणा केली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी थेट लोकसभा अध्यक्षांना आज प्रत्यक्ष भेटून याबाबत पत्र दिल्याने हा मुद्दा चांगलाच तापण्याची चिन्हे आहेत. या पत्रावर काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसपा खासदारांच्या स्वाक्षऱ्या असून आज अखिलेश यादव, फारूख अब्दुल्ला, अरविंद सावंत, विनायक राऊत हे खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत होते.

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. मोहन डेलकर यांच्या रूपाने आम्ही लोकसभेतील आमचा एक सहकारी गमावला आहे. त्यांचा मृत्यू म्हणजे केवळ एका जीवनाचा अंत नसून तो संसदेच्या प्रतिष्ठेवर झालेला आघात आहे. संसद सदस्याला दबावाशिवाय आणि भयमुक्त वातावरणात काम करता आलं पाहिजे. तरच संसद सर्वोच्च आहे या म्हणण्याला अर्थ असेल, असे नमूद करत सुप्रिय यांनी पत्रात गंभीर मुद्द्याकडे लक्ष वेधले.

लोकसभेचे सातवेळा खासदार राहिलेले मोहन डेलकर तणावाखाली होते, असे नमूद करताना डेलकर यांच्या लोकसभेतील अखेरच्या भाषणाचा सुप्रिया यांनी दाखला दिला. दादरा आणि नगर हवेली येथील प्रशासकांकडून डेलकर यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता, त्यांना अपमानित करण्यात येत होते. याबाबत त्यांनी आपली वेदना सप्टेंबर २०२० मध्ये लोकसभेत बोलून दाखवली होती. त्याच तणावातून त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असून याची गंभीर दखल आपण घ्यावी, अशी विनंती सुळे यांनी पत्रात केली आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी डेलकर यांनी लोकसभेत जे गंभीर आरोप केले आहेत त्याची चौकशी व्हायला हवी. त्यासाठी हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात यावे, असेही सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply